लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. जिल्ह्यातील पाण्याखालील बंधाऱ्याच्या संख्येत दोनने वाढ झाली आहे. यामुळे कोल्हापूरच्या ग्रामीण भागासह नदीकाठच्या भागात असलेली पूरस्थिती आजही जैसे थे होती. दरम्यान पुढील चार दिवस पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केल्याने पूर वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
गेली तीन दिवस जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले होते. काल रात्रीनंतर पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने धरण, नद्यातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी काल ४४ फूट ४ इंच होती. ती आज ४३ फूट या धोका पातळीवरून वाहत होती. पाण्याखालील बंधाऱ्यांची संख्या आज ७९ इतकी होती.
आणखी वाचा-कोल्हापूर: राधानगरी धरणाचे सर्व सात दरवाजे तासाभरात उघडले; विसर्ग वाढल्याने सतर्कतेचा इशारा
धोकादायकरित्या वाहतूक
कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर अजूनही सुमारे दीड ते दोन फूट पाणी आहे. चिखली – आंबेवाडी या गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथून धोकादायकरित्या वाहतूक सुरू आहे. या भागातील पाणी संथरित्या कमी होत आहे.
वाहतुकीवर परिणाम
निढोरी, मुरगुड- निपाणी हा आंतरराज्य मार्ग आज तिसऱ्यांदा बंद झाला. वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. पुराच्या पाण्यातून वाहतूक होत असल्याने येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील ९ राज्य व ४४ प्रमुख जिल्हा असे ५३ मार्ग बंद झाले आहेत.