कोल्हापूर : भाजपात अनेक सक्षम उमेदवार असताना आयात केलेला उमेदवार आम्हाला मान्य नाही. त्यामुळे इचलकरंजी मतदार संघाच्या विकासासाठी अपक्ष उमेदवार निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा करीत कोल्हापूर जिल्हा भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष, राज्य यंत्रमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी शुक्रवारी बंडाचा झेंडा रोवला.

इचलकरंजीचे माजी नगराध्यक्ष हिंदुराव शेळके यांचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. यातूनच त्यांनी २००४ साली भाजपमध्ये प्रवेश केल्यावर पक्षाने विधासनभेची उमेदवारीही दिली होती. त्यांचा अर्ज छाननीत बाद झाला होता. पुढे त्यांनी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपदही भूषवले.

हेही वाचा : पावसाचा मुक्काम हटेना; कोल्हापुरात नारंगी इशारा

आवाडे नकोत

आज पत्रकार परिषदेला हिंदुराव शेळके, तम्माण्णा कोटगी, बाळासाहेब मोहिते, विवेक शेळके, अतुल शेळके, अमोल शेळके उपस्थित होते. शेळके म्हणाले, इचलकरंजीत गेली अनेक वर्षे आवाडे विरुद्ध भाजप असे राजकारण आहे. त्यातूनच जिल्ह्यात प्रथम आमदार हाळवणकर यांच्या रुपाने भाजपचे कमळ फुलले होते. अद्यापही भाजपची ताकत मोठी आहे. पक्षात अलका स्वामी, सुनील महाजन, तानाजी पोवार आदी विधानसभेसाठी इच्छुक असताना निष्ठावंतांना डावलून ज्यांच्याशी संघर्ष करून पक्ष वाढवला अशा आवाडे घराण्यात पक्षाने उमेदवारी दिली आहे. हा आयात उमेदवार कार्यकर्त्यांना मान्य नसल्याने विधानसभा निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

जनतेचे पाठबळ

माझे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतही मित्र आहेत. नगरसेवक आणि नगराध्यक्ष असताना शहर पसिरात अनेक कामे केली असल्याने मतदार माझ्या पाठीशी राहतील, असा विश्वास असल्याने जनतेसमोर जाण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : हाळवणकरांना विधान परिषदेला संधी, इचलकरंजीत राहुल आवाडे; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

राजकारण ढवळले

कालच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकाश आवाडे – सुरेश हाळवणकर यांच्यात मनोमिलन घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांची पाठ वळून २४ तास होण्याच्या आत शेळके यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीमध्ये बंडाचा झेंडा हाती घेतल्याने खळबळ उडाली आहे.