कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कचरा संकलनाचे काम करणाऱ्या टिप्पर वाहनावरील चालकांनी किमान वेतन मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. शहरात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर कोल्हापूर महापालिकेने या कर्मचाऱ्यांबाबत कंत्राटदार एजन्सीने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा त्यांना यादीमध्ये टाकण्यात येईल, असा इशारा शनिवारी दिला असल्याने हा प्रश्न चिघळताना दिसत आहे.
टिप्पर गाड्यांवरील चालकांच्या वेतनाची प्रक्रिया गेली सहा महिने सुरू होती. ती प्रक्रिया होऊन एक महिना लोटला तरी कार्यादेश निघालेला नाही. तो त्वरित काढावा किंवा प्राधान्य कर्मचारी या नात्याने त्यांना फरकाचे रक्कम द्यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे केली होती. त्यावर ठोस निर्णय न झाल्याने टिप्पर चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. शनिवारपासून त्यांनी महापालिके जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
हेही वाचा : कोल्हापूर : ऊस तोडणीसाठी अतिरिक्त पैशांकडे मजुराच्या टोळीची पाठ; शेतकऱ्यांकडून स्वागत
काळ्या यादी टाकणार
दरम्यान, ऑटो टिप्पर चालक हे महापालिकेचे कर्मचारी नाहीत. ते बीएम इंटरपाईजेस व शिवकृपा या दोन एजन्सीचे खाजगी चालक आहेत. त्यांच्या वेतनाची जबाबदारी संबंधित कंपन्यांची आहे. कचरा उठाव हे अत्यावश्यक काम आहे. या अत्यावश्यक सेवेसाठी जे चालक येणार नाहीत त्यांना कामावर घेतले जाणार नाही. तसेच संबंधित दोन्ही कंपन्यांची अनामत रक्कम जप्त करून त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल, असा इशारा महापालिकेने शनिवारी दिला.
हेही वाचा : कोल्हापूरात अशी रंगली अनोखी कुस्ती; प्रकाश शेंडगेंना दाखवले मराठा समाजाच्या मल्लाने आस्मान
पर्यायी यंत्रणा कार्यरत
टिप्पर चालक काम बंद आंदोलनात उतरले असले तरी शनिवारी महापालिकेचे कर्मचारी व इतर एजन्सीचे कर्मचारी घेऊन स्वच्छतेचे काम करण्यात आले. यामध्ये २८ ऑटो टिप्पर व २२ ट्रॅक्टर अशा ५० वाहनाद्वारे कचरा उठावाचे काम करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.