कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रखडलेल्या विकास कामावरून शनिवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांची कडक शब्दात कान उघडणी केली. कोल्हापूर महापालिकेंच्या वतीने आयोजित कसबा बावड्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या लोकार्णण सोहळ्यातील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना हसन मुश्रीफ यांचा पारा चढला. कोल्हापूर महापालिकेच्या रखडलेल्या विकास कामाबद्दल तीव्र शब्दांमध्ये नापसंती व्यक्त केली.
कमिशनसाठी काम थांबले
कोल्हापूर महापालिका अंतर्गत रस्ते खराब झाले असल्याने त्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आला आहे. ही कामे दिवाळी पूर्वी होणे अपेक्षित होते. मात्र अजूनही त्याला गती आलेली नाही. ही कामे अधिकाऱ्यांच्या कमिशन मुळे थांबली आहेत, असा थेट आरोप त्यांनी अधिकाऱ्यांवर केला. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांचा नाम उल्लेख करीत त्यांनी कमिशनचा विषय काढला. तेव्हा अडसूळ हे दुसरीकडे पाहत होते. पण, त्यांचे लक्ष वेधून कमिशनमुळे काम थांबता कामा नये, अशी सक्त ताकीद मुश्रीफ यांनी दिली.
हेही वाचा… कचऱ्यात हरवलेल्या सोन्याच्या हाराची अशीही शोधकथा; इचलकरंजी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची तत्परता
बदलीच करतो
शिवाय, महापालिकेचे कामे करायचे नसतील तर अडसूळ यांनी मूळच्या ग्राम विकास खात्याकडे जावे, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सूचित केले. अडसूळ हे पूर्वी ग्रामविकास विभागात होते. मीच त्यांना महापालिकेत आणले होते, अशी आठवण त्यांनी करून दिली.
आयुक्तांना सुनावले
कोल्हापूर शहरातील कचरा प्रकल्पाचे काम करण्याबाबत आयुक्त के.मंजू लक्ष्मी यांना हसन मुश्रीफ यांनी आठवण करून दिली होती. तरीही हे काम झाले नसल्याने मुश्रीफ चांगलेच संतापले. चार दिवसांमध्ये या कामाचे कार्यादेश द्यावेत अन्यथा रविकांत अडसूळ यांना बदला, अशा सूचना मुश्रीफ यांनी यावेळी केली. त्यांनी के. मंजू लक्ष्मी यांना आयुक्त म्हणून राहायचे की जिल्हाधिकारी अशी विचारणा केली. त्या सिंधुदुर्ग येथे पाच वर्षाचे जिल्हाधिकारी होत्या. आता त्यांना पुन्हा या पदाची संधी नाही, असेही त्यांनी नमूद केले.
भ्रष्टाचार थांबणार का?
एकंदरीतच आज कोल्हापूर महापालिकेचा रखडलेला कारभार, त्यातील गैर व्यवहार यावर खुद्द पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीच तीव्र भाषेमध्ये सुनावले आहे. विकास कामे रेंगाळणे बरोबर नाही. लोक टीका करतात. पालकमंत्र्यांच्या नावे आरोप होतात,असे ते म्हणाले. तथापि, यामुळे आता तरी कोल्हापूर महापालिकेतील कासवगतीच्या कामकाजामध्ये सुधारणा होणार का, आणि त्यातील भ्रष्टाचार थांबणार का ?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.