कोल्हापूर : बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे तेथील गारमेंट व्यवसाय भारताकडे वळताना दिसत आहे. ‘महाराष्ट्राचे मँचेस्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत गारमेंट उद्योजकांकडे तयार कपडे निर्मितीची मागणी दुपटीने वाढली असून राज्यभर हे चित्र सर्वत्र दिसत आहे. वर्षभरानंतर पुन्हा एकदा व्यवसायात भरभराट आल्याचे समाधान उद्योजकांमध्ये आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बांगलादेश हा वस्त्रोद्योग निर्मितीत जगातील आघाडीचा देश मानला जातो. चीननंतर तयार कपड्यांचा सर्वात मोठा देश म्हणून या देशाकडे पाहिले जाते. बांगलादेशातील सध्याच्या बिघडलेल्या राजकीय परिस्थितीनंतर तेथील तयार कपडे निर्मितीची (गारमेंट) बाजारपेठ डळमळीत होऊ लागली आहे. तेथील गारमेंट उद्योग भारताकडे वळेल, अशी शक्यता ऑगस्ट महिन्यापासून वर्तवली जात होती. आता ती काही प्रमाणात प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.

हेही वाचा – Chhagan Bhujbal Samta Parishad Baithak : छगन भुजबळ यांचं आक्रमक भाषण “कभी ना डर लगा मुझे फासला देखकर…”

u

महाराष्ट्रात तयार कपडे बनवणाऱ्या व्यावसायिकांकडे गारमेंट निर्मितीची मागणी वाढत चालली आहे. यापूर्वी ज्या कंपन्या गारमेंट निर्मिती करत होत्या त्यांची मागणी कायम आहे. खेरीज, आता नव्या कंपनीचे प्रतिनिधी गारमेंट व्यावसायिकांचे उंबरटे झिजवताना दिसत आहेत. तयार कपडे बनवून द्यावेत यासाठी त्यांना गळ घातली जात आहे. परिणामी नेहमीची तयार कपड्यांची मागणी आणि नव्याने होऊ लागलेली मागणी पाहता गारमेंट व्यावसायिकांकडे त्यांच्या क्षमतेपेक्षा जवळपास दुप्पट तयार कपडे निर्मितीच्या मागणीचा रेटा वाढला आहे. यामुळे गारमेंट व्यवसायात समाधानाची लहर दिसत आहे.


गेल्या दिवाळी वेळी गारमेंट व्यवसायामध्ये निराशाजनक स्थिती होती. बाजारपेठेत मंदी असल्याने तयार कापड निर्मितीचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांनी घटले होते. कामाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने घायकुतीला आलेल्या काही व्यावसायिकांनी मजुरीत कपात केली होती. कामात घट आणि मजुरीचे दर घसरलेले अशा दुहेरी पातळीवर गारमेंट व्यवसायाला झुंजावे लागत होते. अलीकडे गारमेंट व्यवसायामध्ये काहीशी स्थिरता आली तरी मंदीचे चित्र पूर्णतः पालटले नव्हते. त्यात बदल घडला तो बांगलादेशातील अस्थिर परिस्थिती निर्माण झाल्याने. तयार कपडे निर्मिती करून देण्याची मागणी वाढत चालली आहे. आमच्या कंपनीमध्ये दरमहा ५० हजार तयार कपड्यांचे नग तयार होतात. अलीकडे नव्याने मागणी येऊ लागल्याने हे प्रमाण एक लाख नगापर्यंत वाढले आहे. मजुरीमध्ये वाढ झाली नसली तरी कामाचे प्रमाण वाढत आहे ही समाधानकारक बाब आहे. – राजू बोंद्रे, उद्योजक महालक्ष्मी क्रिएशन, इचलकरंजी

हेही वाचा – Sharad Pawar : “जेव्हा ते शांत असतात तेव्हा समजून जायचं की…”; शरद पवारांबद्दल शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा

महाराष्ट्रामध्ये तयार कपडे करून घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. याची दोन कारणे दिसून येतात. बांगलादेशात अशांत परिस्थिती झाल्याने विकेंद्रित क्षेत्रातून तयार कपडे बनवून घेण्याकडे कल वाढला आहे. दुसरे, काही भारतीय कंपन्या बांगलादेशात मजुरीचा दर स्वस्त असल्याने तिकडे तयार कपडे करून घेत होते. आता या कंपन्या भारतातच गारमेंट बनवण्यावर भर देत असल्याने एकूणच मागणीचे प्रमाण वाढले आहे. बांगलादेशातील गारमेंट उद्योगाची व्यापकता आणि तेथील सद्यस्थिती पाहता भारतातील गारमेंट व्यवसायाने ही संधी -साध्य करण्यासाठी सक्षम होणे गरजेचे आहे. – सागर बिरनाळे, उद्योजक हिंदुस्तान गारमेंट, सांगली</p>

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur garment industry bangladesh instability demand from maharashtra ssb