कोल्हापूर जिल्हयातील नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने सर्वच ठिकाणी सत्ता मिळविण्याची केलेली घोषणा प्रत्यक्षात येऊ शकली नसली तरी पालिकांमध्ये सत्तेमध्ये सहभागी होण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपच्या या  ‘सत्तेच्या प्रयोगा’ला कितपत यश येणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. हिवाळी अधिवेशनात नगराध्यक्षांचे अधिकार वाढवल्याने जिल्ह्य़ातील पालिकांमध्ये उपनगराध्यक्ष पद अधिक प्रमाणात भाजपाकडे येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. तर, सत्तेपासून वंचित राहिलेल्या पालिकांमध्ये विषय समिती निवडीमध्ये भाजपचा समावेश व्हावा यासाठी व्यूहरचना सुरू झाली आहे.

जिल्हय़ातील सर्व नऊ नगरपालिकांमध्ये भाजपाची सत्ता येईल असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीपूर्वी व्यक्त केला होता. इचलकरंजी व मलकापूर पालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष झाला, तर जयसिंगपूर पालिकेत भाजपा सत्तेत असलेल्या ताराराणी आघाडीचा नगराध्यक्ष झाला. भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांनी पन्हाळ्यात नगराध्यक्षसह सत्ताही मिळविली. मात्र कागल (राष्ट्रवादी), गडिहग्लज (जनता दल), कुरुंदवाड (काँग्रेस), वडगाव (युवक क्रांतिदल), मुरगुड (शिवसेना) येथे अन्य पक्षांचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. यामुळे सत्ता नसलेल्या पालिकांमध्ये सत्तेत सहभागी होण्यासाठी भाजपने प्रयत्न चालविले आहेत.

तीन पालिकांमध्ये दोन्ही काँग्रेस एकत्र

इचलकरंजीत काँग्रेस-राष्ट्रवादी व शाहू आघाडी यांनी, तर जयसिंगपूर मध्ये दोन्ही काँग्रेसच्या शाहू आघाडीने एकत्रित राहण्याचा निर्णय घेतला असल्याने भाजपसह विरोधकांना तूर्तास नगराध्यक्ष पदावर समाधान मानावे लागणार असून विषय समिती सभापती निवडीपासून वंचित राहावे लागणार आहे. अधिनियमातील नव्या बदलाचा कानोसा घेता या दोन्ही मुख्य पालिकांमध्ये उपनगराध्यक्ष भाजपाकडे जाण्याची शक्यता बळावली आहे. कुरुंदवाडमध्ये काँग्रेसचे रावसाहेब पाटील नगराध्यक्ष बनले असले तरी त्यांनाही विकासकामाचा निधी देण्याचा शब्द देत सत्तेत सहभागी करून घ्यावे, असा प्रस्ताव भाजपने दिला आहे. तथापि येथे परस्पराविरोधी लढलेले काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र राहण्याचे संकेत आहेत.

जनता दल भाजपसेनेसोबत

जनता दलाचे ज्येष्ठ नेते श्रीपतराव िशदे यांनी गडिहग्लजचा गड जनता दलाकडे राखण्यात आणि कन्या स्वाती कोरी यांना नगराध्यक्षा बनविण्यात यश मिळविले. या पालिकेत जनता दलाने भाजपसोबत राहावे असा प्रस्ताव भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिला होता. त्यानुसार जनता दल प्रथमच भाजप व शिवसेनेसोबत एकत्र आली असून त्यांनी शहर विकास आघाडीची स्थापना करत राष्ट्रवादीला एकाकी पाडले आहे. धर्मनिरपेक्षाच्या तत्त्वाला स्थानिक राजकारणाच्या मुद्दय़ावरून जनता दलाने सोडचिठ्ठी दिल्याचे येथे दिसून आले आहे.

चंद्रकांतदादांची मुत्सद्देगिरी

चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रात भाजपने ताकद वाढविण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले. यामध्ये चंद्रकांत पाटील यांची मुत्सद्देगिरी मोठी होती. त्यांच्या प्रयत्नातून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दिग्गज भाजपकडे वळले आहेत. यामुळे एकेकाळी भाजपला स्थानही नसलेल्या या प्रांतात आता पक्षाने आपले पाय भक्कम रोवण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील पक्षाचे हे यश लक्षणीय आहे.  चंद्रकांत पाटील यांच्या या पदोन्नतीमुळे कोल्हापूरच्या विकासाला गती येऊन प्रलंबित असणारे विमानतळ, प्राधिकरण, तीर्थक्षेत्र-पर्यटन आराखडा आदी विषय मार्गी लागतील, असा विश्वास भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केला.

वडगावचा कल भाजपकडे

वडगांव मध्ये भाजपला अपयश आले असले तरी युवक क्रांति दलाचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांना विकासकामासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन देऊन पालकमंत्र्यांनी त्यांचा कल भाजपकडे राहील या दिशेने पावले टाकली आहेत.

Story img Loader