कोल्हापूर : विशाळगडावर यासीन भटकळ का आला होता, कोणाकडे राहिला होता याची चौकशी केली जाईल. तो आला होता हे माहीत असूनही पोलीस का गप्प राहिले याचीही चौकशी केली जाईल. असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी व्यक्त केले.
इंडिया आघाडीने विशाळगडला भेट दिली भेट देऊन मदत केली आहे. याकडे लक्ष वेधले असता मुश्रीफ म्हणाले, शासनाच्या वतीने तेथे पंचनामे केले जात आहेत, त्यांना अधिकाधिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न राहील.
पालकमंत्री म्हणून मुश्रीफ यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे विधान केले होते, अशी टीका केली जात आहे. याबाबत ते म्हणाले, तेथे अतिक्रमण असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. पण आता तेथे कारवाई केली गेली आहे. विशाळगडवर अनुचित प्रकार घडणार नाही असा शब्द आंदोलकांनी दिला होता. त्यामुळे पोलीस गाफील राहिले. तेथे नेमके काय घडले हे तपासून बाहेर येईल.
सामाजिक सलोखा बिघडवून सातत्याने कारस्थाने होत असल्याच्या विरोधात आणि सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी उद्या गुरुवारी येथे शिव शाहू सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. विशाळगड घटनेच्या पार्श्वभूमीवर शाहू समाधी स्थळ ते छ.शिवाजी पुतळा निघणाऱ्या रॅलीत शिव शाहू प्रेमी कोल्हापूरकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा…कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता जारी; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आदेश
रॅलीचे स्वागत- मुश्रीफ
दरम्यान, याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. राजर्षी शाहूंच्या भूमित कोणी असे करत असेल तर स्वागत आहे.