कोल्हापूर : ‘यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार’ विजेत्या मोठ्या ग्रामपंचायतींना १५ लाख व छोट्या ग्रामपंचायतींना १० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी येथे केली. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार, आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार, यशवंत सरपंच पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते महासैनिक दरबार हॉल येथे करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनुक्रमे मनीषा देसाई, अरुण जाधव तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला समतेचा संदेश देशाला आजही मार्गदर्शक आहे. अनेक क्षेत्रांतील अतुलनीय कार्याबरोबरच समाज सुधारणेतील त्यांचे कार्य अद्वितीय आहे. राधानगरी धरणाची उभारणी, सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा, शिक्षणासाठी अर्थसहाय्य, अस्पुष्यता निवारणाचा कायदा आदी अनेक क्षेत्रांतील त्यांचे कार्य मोलाचे आहे. शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धिमत्ता जाणली होती, त्यांच्या उच्च शिक्षणाला शाहू महाराजांनी पाठबळ दिले. शाहू महाराजांनी समतेचा, पुरोगामी विचारांचा ठसा आपल्या समोर ठेवला आहे. रयतेसाठी, पर्यावरण रक्षणासाठी, प्रशासकिय क्षेत्राच्या उन्नतीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय, कार्य समाजाला मार्गदर्शक आहेत. शाहू महाराजांच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळेच कोल्हापूर जिल्हा अनेक क्षेत्रात अग्रेसर असून त्यांच्या विचारांनीच कोल्हापूरकरांची वाटचाल सुरु आहे. त्यामुळेच वीजेचे बिल वेळेत भरणारे शेतकरी म्हटले की कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा उल्लेख होतो, अशा शब्दांत त्यांनी शाहू विचारांची जोपासना कोल्हापुरात होत असल्याचा उल्लेख केला.

हेही वाचा : जागतिक बँकेच्या पथकाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील पूरप्रवण क्षेत्राची पाहणी

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे विविध विभागांतील काम उत्कृष्ट आहे. शाहू महाराजांनी शिक्षण, उद्योग, सहकार आदी अनेक क्षेत्रांच्या उन्नतीसाठी घेतलेले क्रांतिकारी निर्णय समाजाला आजही मार्गदर्शक आहेत. त्यांच्या विचारांनी वाटचाल करण्याचा आपण संकल्प करुया. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून यापुढेही कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात सर्व बाबींत अग्रेसर ठरवुया, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी प्रास्ताविकातून जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या व भविष्यात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी मानले. माणगावचे सरपंच राजू मगदूम व गोलीवडेच्या ग्रामसेवक विद्या जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.