कोल्हापूर : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातील साधारणत: ४० गावांमधून जातो. या महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याचे संकट ओढवले आहे. हा शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा लागणार असल्याची बाब आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन बनविणारा हा महामार्ग रद्द होण्यासाठी प्रसंगी सर्वपक्षीय व्यापक जनआंदोलनाची गरजही मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. पालकमंत्री मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली आहे.
मुश्रीफ यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लोकसभेच्या निकालाबाबत कारणमीमांसा करण्यासाठी मुंबईत पक्षाची मीटिंग बोलावली होती. तीमध्ये शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या नाराजी व संतापाला सामोरे जावे लागण्याचे प्रमुख कारण मी स्पष्ट केले होते. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही निदर्शनास ही बाब आणून दिली. दरम्यान; या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूरवरून या बैठकीत सहभागी झाल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. तसेच; महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मंत्री दादा भुसे आहेत, तेही त्या बैठकीला नव्हते. दरम्यान, माजी खासदार संजय मंडलिक यांनीही मुंबईत झालेल्या शिवसेना- शिंदे गटाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याविषयी चर्चा केल्याचीही, त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : शालेय पोषण आहारात यंदापासून १५ लज्जतदार पदार्थ
मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्रात आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे आधीपासूनच अधिक मजबूत आहे. त्यामुळे या नवीन महामार्गाची काहीही आवश्यकता नाही. तसेच; या महामार्गाला पर्यायी मार्गाची मागणीसुद्धा संयुक्तिक आणि योग्य नाही.
हेही वाचा : विनोद तावडे आणखी मोठे होतील – चंद्रकांत पाटील
पर्यायी महामार्गसुद्धा नकोच
मुश्रीफ यांनी म्हटले आहे, हा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करून पर्यायी मार्ग करा म्हणणेसुद्धा संयुक्तिक आणि योग्य नाही. कारण; पर्यायी महामार्गामध्येसुद्धा जाणाऱ्या जमिनी शेतकऱ्यांच्याच असणार आहेत. हा मार्ग रद्दच करावयाचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन फारमोठे सर्वपक्षीय जनआंदोलन उभारावे लागेल. प्रसंगी, कोणतीही किंमत मोजून हा महामार्ग रद्द करण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी म्हटले आहे.