कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ नामविस्तारावरून कोल्हापुरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील वातावरण तापले आहे. या विद्यापीठाच्या नावातील ‘शिवाजी’ हा एकेरी उल्लेख काढून ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात यावा, अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली असून, त्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटाने शनिवारी झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत असा नामविस्तार करू नये, असा स्थगन प्रस्ताव मांडला असून, तो मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही गटांच्या भूमिकेमुळे शिवाजी विद्यापीठ नामविस्तार प्रकरण ऐन उन्हाळ्यात चांगलेच तापू लागले आहे.

शिवाजी विद्यापीठाची स्थापना १९६२ मध्ये झाली. तेव्हा विद्यापीठाला शिवाजी महाराजांचे नाव देण्याचे ठरले. हे नाव देताना छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे लांबलचक नाव ठेवले, तर त्याचे लघुरूप होऊन त्यातील शिवाजी हा शब्द उच्चारला जाणार नाही, असा तर्क तेव्हा मांडण्यात आला होता. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह सर्वांनी मान्यता दिली होती. शिवाजी विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले.

तथापि, त्यानंतर गेल्या ५० वर्षांमध्ये राज्यातील अनेक संस्था, रस्ते यांना शिवाजी असे एकेरी असलेले नाव बदलत त्या जागी छत्रपती शिवाजी महाराज असा बदल करण्यात आला. यातूनच शिवाजी विद्यापीठाचाही नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा करण्याची मागणी गेल्या काही वर्षांत ठरावीक काळाने होत होती. सध्या कोल्हापूर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी ही मागणी लावून धरल्याने या वादाने पुन्हा उचल खाल्ली आहे. या मागणीसाठी त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

हिंदू जनजागृती, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचा सोमवारी मोर्चा

‘शिवाजी विद्यापीठ’ या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण आणि एकेरी उल्लेख होतो. अशा एकेरी नावाच्या अनेक संस्था, स्थळ, रस्त्यांची नावे आता बदलण्यात आली आहेत. यानुसारच विद्यापीठाचे नाव अधिक सन्माननीय आणि पूर्ण स्वरूपात ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे विस्तारावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समिती यांनी केली आहे. यासाठी या संघटनांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

स्थगन प्रस्ताव चर्चेविनाच मंजूर

दरम्यान, दुसऱ्या गटाचा याला विरोध आहे. शिवाजी विद्यापीठ हे नाव सर्वतोपरी विचार करून ठेवण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार झाला तर त्याचे इंग्रजीत लघुरूप केले जाऊन शिवाजी या नावाचा उल्लेख होणार नाही. मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’चा उल्लेख ‘सीएसटी’असा केला जातो. त्यामुळे विद्यापीठाचे नाव शिवाजी असेच राहिले पाहिजे, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे. यातूनच आज विद्यापीठाच्या अधिसभेत अभिषेक मिठरी, श्वेता परळीकर यांनी नामविस्तार करू नये हा मांडलेला स्थगन प्रस्ताव चर्चेविना मंजूर करण्यात येत असल्याचे कुलगुरू डॉ. डी. व्ही. शिर्के यांनी जाहीर केले.

Story img Loader