कोल्हापूर : विधवा, विधुर यांना समाजात दुय्यम स्थान दिले जातानाचा अनुभव तसा नेहमीचाच. परंतु कागल तालुक्यातील सोनाळी येथील एका सेवानिवृत्ती शिक्षकांनी हे बंध तोडून देत विधवा, विदुर यांच्या हस्ते गृहप्रवेश करून पुरोगामी विचारसरणीचा पायंडा पाडला. त्यांच्या या उपक्रमाचे जिल्ह्यात स्वागत, कौतुक होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने पतीच्या निधनानंतर त्याच्या पत्नीला पार पाडाव्या लागणाऱ्या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. आता याच्या पुढे एक पाय टाकत सोनाळी ( ता. कागल ) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी.व्ही. पाटील व त्यांच्या कुटुंबाने आपल्या नवीन वास्तूचा गृहप्रवेश विधवा महिला आणि विधुरांचे पाद्यपुजन करुन साजरा करत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

हेही वाचा – कोल्हापुरात संभाजी महाराज जयंती सोहळ्यात १२ तास लाठीकाठीचा उपक्रम

अनोख्या संकल्पना गती

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात पी. व्ही. पाटील यांनी योगदान देत मुख्याध्यापक म्हणून २८ वर्षे काम केले. बिद्री ( ता. कागल ) येथील भारतमाता हायस्कूल या शाळेतून ते ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी सोनाळी गावी बांधलेल्या नवीन वास्तूच्या गृहप्रवेशावेळी पारंपारिक रुढी, परंपरांना फाटा देत कुठल्याही मंगल कार्यापासून वंचित ठेवल्या जाणाऱ्या विधवांना तसेच विधुरांना सामावून घेण्याचे ठरवले.

कुटुंबियांचे पाठबळ

त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या वयोवृद्ध आई, पत्नी, मुले आणि सुना या सर्वांनीच पाठिंबा दिला. पतीचे अकाली निधन झालेल्या गावातील विधवा महिला आणि संसाराच्या अर्ध्या वाटेवर पत्नीची साथ सुटलेल्या विधुरांना पाटील कुटुंबियांनी वास्तुशांतीसाठी आग्रहाचे निमंत्रण दिले. नव्या घरात त्यांचे पाद्यपुजन करुन या सर्वांच्या उपस्थितीत पाटील कुटुंबाने गृहप्रवेश केला. यावेळी सर्व पाटील कुटुंबीय उपस्थित होते.

हेही वाचा – कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाची महापालिका, प्रांत विभागाकडून पाहणी सुरू; जयंती नाल्याचे पाणी थेट नदीत मिळत असल्याचे उघडकीस

गावकऱ्यांकडून कौतुक

अनिष्ट रुढींच्या गर्तेत अडकलेला समाज काय म्हणेल याचा क्षणभरही विचार न करता पी. व्ही. पाटील यांनी आपला गृहप्रवेश विधवांच्या हस्ते संपन्न केला. त्यांच्या या उपक्रमाचे गावासह परिसरातूनही कौतुक होत आहे.

चेहऱ्यावरील आनंद मौल्यवान

“मी आईच्या गर्भात असतानाच दुर्देवाने तिला वैधव्य आले. त्यामुळे माझ्यासह भावंडांचा सांभाळ करताना तिला सहन कराव्या लागलेल्या हालअपेष्टा मी स्वतः अनुभवल्या आहेत. तिच्यासारख्याच अन्य महिलांचाही सन्मान व्हावा, या उद्देशाने त्यांचे पाद्यपुजन करुन गृहप्रवेश केला. अशा मंगल समयी अनेक वर्षांनंतर अग्रस्थान मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा आपल्यासाठी अन्य गोष्टींपेक्षा मौल्यवान होता”. – पी. व्ही. पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur house entry by widows padya puja a progressive step by retired principal in sonali ssb