कोल्हापूर : एसटी बसखाली सापडून शिक्षक ठार झाल्याची घटना शनिवारी इचलकरंजीत घडली. विजयकुमार बाळासो चौगुले ( रा. यड्राव ) असे या शिक्षकाचे नाव आहे.
शनिवारी सकाळी हा अपघात झाला. इचलकरंजीकडे येणाऱ्या एसटीला ओव्हर टेक करत दुचाकीस्वार चौगुले जात होते. तेथे महापालिकेचे रस्ता बांधणीचे काम चालू आहे. विजेच्या खांबाच्या तुटलेल्या तारेमध्ये दुचाकी अडकल्याने दुचाकीचालक चौगुले खाली पडले. याचवेळी मागून एसटी बस येत होती. तिच्या मागील चाकाखाली ते सापडले. डोक्यावरून चाक गेल्याने ते जागीच ठार झाले.
येथे रस्ता बांधणीचे काम अगदी संथगतीने चालू आहे. त्याचा दर्जा निकृष्ट आहे. अनेक वाहने खडी, वाळूमुळे घसरून पडून छोटे अपघात, वाद निर्माण झाले आहेत. पण कुणीच गंभीरपणे याची दखल घेत नाहीत, असा प्रवासी, वाहनधारक, कार्यकर्त्यांचा आक्षेप यावेळी दिसून आला.