कोल्हापूर : यात्रेच्या पूर्वसंध्येला वाडी रत्नागिरी येथील जोतिबाचा डोंगर भक्तांच्या अलोट गर्दीने फुलून गेला आहे. दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या पौर्णिमा यात्रेचा उद्या मंगळवार हा मुख्य दिवस असून सोमवार रात्रीपर्यंत तीन लाख भाविक दाखल झाले आहेत. चैत्र यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीसाठी मानाच्या सासन काठया जोतिबा डोंगरावर दाखल झाल्या आहेत . चांगभलंच्या गजराने अवघा जोतिबाचा डोंगर दुमदुमून गेला आहे. डोंगर वाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. बैलगाडी, खाजगी वाहनातून पायी चालत भाविक जोतिबा डोंगरावर आले आहेत . जोतिबा मंदिरात पहाटे तीन पासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ होईल . पाच वाजता शासकीय महाभिषेक पन्हाळा तहसिलदार यांचे हस्ते होईल. १० वाजता धुपारती सोहळा होईल. जोतिबा डोंगरावरील सासन काठयाची मिरवणुक मुख्य आकर्षण असते. दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे हस्ते मानाच्या पहिल्या सासनकाठीच्या पुजनाने मिरवणुकीस प्रारंभ होईल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चैत्र यात्रेत गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते. सासनकाठ्या चाळीस फूट उंचीच्या असतात. रंगीबेरंगी कपड्यांनी सजविलेल्या सासनकाठ्या आकर्षक व सुंदर दिसतात. काही काठ्यांना नोटांच्या माळा, फुलांच्या माळा असतात. हलगी, पिपाणी, तुतारी, सनईच्या तालावर काठ्या विशिष्ट पद्धतीने नाचविल्या जातात. भर उन्हात तरुण वर्ग, गुलालात चिंब होऊन नाचतो. सर्वांच्या मुखात जोतिबाच्या नावानं चांगभलचा अखंड गजर असतो.

हेही वाचा: संविधान मोडून काढण्यासाठी ‘चार सो पार’ची धडपड – संभाजीराजे छत्रपती

दुपारी १२ वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होईल .त्यावेळेस देवस्थान कमिटीचे म्हालदार चोपदार तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ होईल. या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान पाडळी (जि.सातारा) या सासनकाठीचा,त्यानंतर मौजे विहे (ता.पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता.मिरज), कसबा सांगाव (ता.कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली) यांच्या मानाच्य एकूण १०८ सासनकाठ्या सहभागी असतात. या मिरवणुकीमध्ये २० फुटांपासून ते ७० ते ८० फुटांच्या उंचच उंच सासनकाठ्या सहभागी असतात. हस्तनक्षत्रावर सांय ५ . ४५ वाजता श्री . जोतिबाचा पालखी सोहळा निघेल. यावेळी तोफेच्या सलामीने जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ होईल .सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात यमाईदेवी व जमदग्नी यांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी होईल. श्री जोतिबा मंदिरात येऊन तोफेच्या सलामीने रात्री दहा वाजता पालखी सोहळ्याची सांगता होईल.

हेही वाचा: संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ पदफेरीत राजारामपूरी, शाहूपूरी व्यापारी पेठ एकवटली

मुख्य यात्रेचा धार्मिक विधी :

महाराष्ट्र, कर्नाटकसह आदी राज्यांतील कोट्यावधी भाविकांचे कुलदैवत, श्रध्दस्थान असलेल्या श्री केदारनाथ (जोतिबा) देवाची चैत्र यात्रेच्या मुख्य दिवसातील धार्मिक विधी मंगळवार १९ एप्रिल २०२४ कामदा एकादशी पालखी सोहळा सुरू (एकुण पालखी १६) रोज रात्री ८:३० वाजता मंगळवार दि. २३ एप्रिल २०२४ चैत्र यात्रेचा मुख्य दिवस पहाटे ३ वा महाघंटा नाद, काकड, आरती , पाद्यपूजा, मुखमार्जन होईल. ५ ते ६ वा. श्रींचे मुख्य पुजारी व शासकीय महाअभिषेक पन्हाळा तहसीलदार व देवस्थान इनचार्ज व अन्य पुजारी यांचे उपस्थितीत संपन्न होईल.स.६ ते ८ श्रींची राजदरबारी बैठी अलंकार महापूजा बांधली जाणार आहे .सकाळी १०:३० ते दु. १२:०० वा पर्यत धुपारती. दुपारी १२ वा सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे हस्ते मानाच्या काठीचे पुजन करून होईल. ५. ४५ वाजता तोफेची सलामी होताच मंदिरातुन श्रीं च्या पालखीचे प्रस्थान श्री यमाई मंदिराकडे होईल. पालखीचा पहिला विसावा कमलाकर मिटके (राजाज्ञे) या ठिकाणी होईल .कारण या ठिकाणी सूर्यदेव तेथे श्री .नाथांच्या दर्शनास येतात. पालखीचा दुसरा विसावा पागीता येथे होईल .सुर्यास्त सायं. ०६:४५ नंतर यमाई मंदिरातील सदरेवर पालखी विराजमान होईल. या वेळी यमाई (रेणुका) आणि कट्यार रूपी जमदग्नी यांचा विवाह संपन्न होईल.रात्री ८ वाजता जोतिबा ची पालखी मंदिराकडे प्रस्थानहोईल. रात्री ९. वाजता पालखी जोतिबा मंदिरातील सदरेवर विराजमान होईल तोफेच्या सलामीने रात्री १० वा पालखी सोहळा पूर्ण होईल.आरती अंगारा वाटप झाल्या नंतर रात्री ११ वाजता श्री. जोतिबा देव मूर्तीस शाही स्नान होईल. मंगळवारी रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले राहील .

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur jotiba yatra 2024 schedule timings sasan kathya puja timings css