रणरणत्या उन्हातही भाविकांची गर्दी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘जोतिबाच्या नावाने चांगभल’चा अखंड गजर करत महाराष्ट्राचे कुलदैवत श्री जोतिबाची चत्र पौर्णिमा यात्रा वाडी रत्नागिरी येथे सोमवारी मोठय़ा उत्साहात पार पडली. रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेशातून आलेल्या सहा लाखांहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली. पहाटे शासकीय पूजा, अभिषेक झाल्यानंतर जोतिबाचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर आलेल्या भाविकांनी श्री दर्शन,  दुपारी सासनकाठ्यांची मिरवणूक व सायंकाळी पालखीचे दर्शन घेऊन आणि गुलाल-खोबऱ्याची उधळण करून परतीचा मार्ग धरला.

वाडी रत्नागिरी (जोतिबा डोंगर) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाची चत्र यात्रा सोमवारी चत्र पौर्णिमेच्या दिवशी उत्साहात झाली. गेल्या दोन दिवसांपासून या यात्रेसाठी महाराष्ट्र व आसपासच्या राज्यातून लाखो भाविक कोल्हापुरात येत होते. आज यात्रेच्या मुख्य दिवस होता. अवघा जोतिबा डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. एसटी, रेल्वे, ट्रक, मोटारसायकल, बलगाडी अशा वाहनाने आणि चालत देखील आलेल्या भाविकांसाठी कोल्हापूर शहरातून जोतिबा डोंगराकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग तयार केले होते. सर्व मार्गावर आज भाविकांची प्रचंड गर्दी होती.

पहाटे श्री जोतिबाची शासकीय अभिषेक व पूजा  झाली. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांनी प्रचंड मोठ्या रांगा लावून जोतिबाचे दर्शन घेतले. दुपारी मानाच्या सासनकाठ्यांची पूजा करून सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. सासनकाठ्यांची मिरवणूक जोतिबा मंदिर ते यमाई मंदिपर्यंत पार पडली. यामध्ये मानाच्या निनाम पाडळी, विहे पाठण, कसबे डिग्रज, करवीर संस्थान, कसबा सांगाव, किवळ, मोजे वाडी रत्नागिरी, कोडोली, मनपाडळे, फाळकेवाडी, दरवेस पाडळी, विठ्ठलवाडी, बागणी, आष्टा यांसह शंभरावर सासनकाठ्या सहभागी झाल्या होत्या.

सायंकाळी जोतिबाच्या पालखीचा मुख्य सोहळ्यास प्रारंभ  झाला. जोतिबा मंदिर ते यमाई मंदिर या मार्गावर निघणाऱ्या या पालखीचे व जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी मार्गावर दुतर्फा भाविकांनी एकच गर्दी केली होती. पालखीवर गुलाल खोबरे याची उधळण करण्यात आली. पालखीचे दर्शन घेतल्यानंतर भाविक परतीच्या मार्गावर लागले. जोतिबाच्या यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पोलिस व जिल्हा प्रशासनाने चोख बंदोबस्त व सोयीसुविधा उपलब्ध केल्या होत्या. पोलीस, होमगार्ड, एसआरपी, व्हाइट आर्मी व सामाजिक संघटनेचे स्वयंसेवक भाविकांच्या रांगा लावून सर्व व्यवस्था पाहत होते. बाहेरगावावरून आलेल्या भाविकांनी येथील श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. करवीर दर्शनाचाही लाभ घेतला.

राबणाऱ्यांचे हात हजारो

जोतिबा यात्रेच्या निमित्ताने कोल्हापूर शहर ते जोतिबा डोंगर या परिसरात कोल्हापुरातील जनतेच्या दातृत्वाचे दर्शन घडले. भाविकांसाठी विविध प्रकारचे सेवादान करवीरकरांनी दिले. अन्नदान, महाप्रसाद, पाणी, सरबत, चहा, नाश्ता, आरोग्यसेवा, औषध, वाहन दुरुस्ती या सर्व सेवा प्रत्येक वळणावर तनात अन् त्याही सर्व मोफत होत्या. आर. के. मेहता, सहजसेवा ट्रस्ट यांनी मोफत अन्न वाटप केले. लाखो भाविकांनी याचा लाभ घेतला.