कोल्हापूर : गेल्या चार वर्षांच्या कालावधीत ३२ घरफोडी करणाऱ्या तिघांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. महाराष्ट्र कर्नाटकात चोऱ्या करणाऱ्या या चोरट्यांकडून ६१ तोळे सोन्याचे दागिने, ४ किलो चांदी असा ६७ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सलीम महंमद शेख, जावेद मोहम्मद शेख, तौफिक मोहम्मद शेख अशी या चोरट्यांची नावे आहेत. या कारवाईबाबतची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,

गेल्या चार वर्षांत ग्रामीण भागात घरफोडींचे सत्र सुरू होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पथके नेमून सखोल तपास चालवला होता. शाहूवाडी जवळील आंबा घाटात सापळा रचून वरील तिघांना अटक केली. पाच दिवस पोलीस त्यांच्या मागावर होते, अनेक वेळा या सराईत चोरट्यांनी पोलिसांना गुंगारा दिल्यामुळे पोलिसांना वेशांतर करावे लागले. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, डॉ. बी. धीरजकुमार, अजित टिके आदी अधिकारी उपस्थित होते.

आजची कारवाई ही एकाच वेळी सर्वाधिक ३२ गुन्हे उघडकीस आणणारी आहे. यात सर्वाधिक करवीर पोलीस ठाण्यातील १८ गुन्हे आहेत. तर जुना पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे आहेत. या पथकाला बक्षीस देण्यात येणार आहे. जावेद महंमद शेख, सलीम महंमद शेख आणि तोफिक महंमद शेख हे एकमेकांचे नात्याने सावत्र भाऊ आहेत. सलीम शेख याच्यावर विविध ठिकाणी १३ चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तर तौफिक शेख हा मोटरसायकल चोरीतील सराईत आहे.

पोलिसी खाक्या दाखवताच भावा-भावांनी मिळून गेल्या चार वर्षांत ६७ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, सागर माने, संजय कुंभार, महेश खोत, लखनसिंह पाटील, महेश पाटील, विजय इंगळे, संदीप बेंद्रे, शुभम संकपाळ, विशाल चौगुले, प्रवीण पाटील, अमित सर्जे, अरविंद पाटील, सागर चौगुले, अमोल कोळेकर, सुरेश पाटील, कृष्णात पिंगळे, सुशील पाटील, राजेंद्र वरंडेकर, राजेश राठोड, रोहित मर्दाने, यशवंत कुंभार, नामदेव यादव, सायली कुलकर्णी, प्रज्ञा पाटील, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अतिश म्हेत्रे यांनी मोलाची कामगिरी बजावली.