कोल्हापूर : नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाला विरोध करीत कागल तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, या मागणीचे निवेदन तहसीलदार अमरदीप वाकडे यांना देण्यात आले.

शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध होत आहे. जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्ग होणार नाही अशी अधिसूचना विधानसभा निवडणूक काळात जारी करण्यात आली होती. अलीकडे हा महामार्ग झाला पाहिजे यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. शक्तिपीठ महामार्ग होण्यासाठी समर्थन मेळावे घेतले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी पुन्हा संघटित होत आहेत. यातूनच कागल तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. रद्द करा, रद्द करा – शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करा अशा घोषणा देण्यात आल्या.

माजी आमदार संजय घाटगे, शिवाजी मगदूम, गिरीश फोंडे, सरपंच मोरे, सम्राट मोरे, शिवाजी कांबळे आदींनी कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग जाणार नाही असे सांगितले जात होते. पण शेतकऱ्यांना पाचपट, दहापट मोबदला देतो असे आमिष दाखवले जात आहे. याला बळी पडणार नाही, असे भाषणातून सांगितले.

शक्तिपीठ आंदोलकांची भूमिका

यावेळी हा महामार्ग १२ जिल्ह्यातून जाणार असून याला विरोध शेतकरी करत आहेत. हा महामार्ग शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा असल्याचे शेतकरी टाहो फोडून सांगत आहेत. या सरकारला ते ऐकू जात नाही. या महामार्गामुळे पाणी पुरवठा योजना, कूपनलिका, विहिरी, छोटे उद्योग यांचे अतोनात नुकसान होणार आहे. यामुळे हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे आणि तो रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमीका आंदोलकांनी घेतली आहे.

हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारून थट्टा करण्याचे पाप सरकारने केल्याची टीका करण्यात आली. या महामार्गा ऐवजी करवीर निवासिनी महालक्ष्मी व तुळजाभवानी मंदिरांचा कायापालट करण्यासाठी सरकारने निधी द्यावा, यातून रोजगार निर्मिती, अशी मागणी अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणावेळी केली.