कोल्हापूर : करवीरचे आमदार पी. एन. पाटील हे घरी पाय घसरून पडल्याने जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन कुटुंबीयांनी सोमवारी केले आहे.
जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार पाटील हे घरी पाय घसरून पडल्याने जखमी झाले. त्यांना ॲस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मेंदूला मार लागल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली. आज पहाटे सिटी स्कॅन चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल चांगला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून कालच्या पेक्षा आज सुधारणा होत आहे, अशी माहिती मुंबईहून आलेले डॉ. सुहास बिरजे, डॉ. अजय केणी यांनी दिली.
हेही वाचा – कोल्हापुरात महालक्ष्मी चरणी लाखभर भाविक
हेही वाचा – कोल्हापुरातील रंकाळा तलावाची रया गेली; विद्रुपीकरण खंतावणारे
दरम्यान, रुग्णालयात मोठ्या संख्येने लोक, कार्यकर्ते जमू लागले. समाज माध्यमातून अफवा पसरू लागल्या. त्यावर त्यांचा मुलगा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी कार्यकर्त्यांना पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. परंतु परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयामध्ये गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.