कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचा सन २०२४-२५ वर्षाचा करवाढ विरहित अर्थसंकल्प मंगळवारी प्रशासक आयुक्त के. मंजू लक्ष्मी यांनी सादर केला. १२६१ कोटी जमा, १२५८ कोटी रुपये खर्च आणि ३ कोटी रुपये शिलकेचा हा अर्थसंकल्प असून जुन्या योजनांना नव्याने कल्हई करण्यावर भर दिला आहे.
अंदाजपत्रक सादर करण्यापूर्वी नागरिकांकडून सूचना, अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्याचा यामध्ये अंतर्भाव केला असल्याचे सांगण्यात आले. महाराणा प्रताप चौक येथे व्यापारी संकुल, पंचगंगा घाट विकास कामे, पंचगंगा स्मशानभूमी विकसित करणे या कामाचा अंतर्भाव आहे.
हेही वाचा – खासदार धैर्यशील माने यांच्या फलकावरील क्युआर कोडवर कुटचलनाची माहिती
मलनिस्सारण योजनांना गती
अमृत दोन योजनेअंतर्गत मलनिस्सारण व तलाव संवर्धन योजना राबवली जाणार आहे. जयंती नाला ५२ कोटी, दुधाली नाला ५७ कोटी, लाईन बाजार ३२ कोटी, बापट कॅम्प १४५ कोटी व राज्य नगरोत्थान ४० कोटी अशी मलनिस्सारण कामे तर रंकाळा तलाव संवर्धन १२ कोटीची कामे प्रस्तावित आहेत.
पर्यटनाकडे लक्ष
पर्यटन वाढीसाठी रंकाळा येथे बोटॅनिकल गार्डन, महालक्ष्मी मंदिरात ध्वनीयुक्त विद्युत खांब, दिशादर्शक फलक, रंकाळा महोत्सव ही कामे करण्यावर भर देण्यात आला आहे. महापालिकेने कर वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. घरफाळा सवलत, पाणीपुरवठा सवलत ,परवाना सवलत याद्वारे अधिक उत्पन्न मिळाले असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा – राजू शेट्टी महाविकास आघाडीबरोबर ?
घटत्या उत्पन्नाची चिंता
अर्थसंकल्पात काही नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश केला असला तरी महापालिकेचे आक्रसणारे उत्पन्न पाहता विकास कामे मार्गी कशी लागणार हा प्रश्न आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, उप-आयुक्त शिल्पा दरेकर, सहा. आयुक्त संजय सरनाईक्, डॉ. विजय पाटील, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुनिल काटे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, आदी अधिकारी उपस्थित होते.