कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेला नवीन आयुक्त मिळाला आहे. मंजू लक्ष्मी यांची कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले होते. मंजू लक्ष्मी या उद्या बुधवारी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक कादंबरी बलकवडे यांची दोन महिन्यांपूर्वी बदली झाली. त्यानंतर हे पद रिक्त होते. महापालिकेला आयुक्तपद मिळावा यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. तथापि ही निवड लांबत चालली होती. त्यामुळे जनआंदोलनही सुरू झाले होते. आम आदमी पक्षाने दोन दिवसांपूर्वी या मागणीसाठी फलकबाजी केली होती. तर स्वातंत्र्यदिनी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरला लवकरच आयुक्त मिळेल, असे आश्वस्त केले होते.
हेही वाचा – कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात पीएचडी संशोधनाच्या नावावर धूळफेक; अभ्यासकांचा आरोप
आता आठवडाभर उशिरा का असेना पण मंजू लक्ष्मी यांच्या रुपाने कोल्हापूर महापालिकेला आयुक्त मिळाला आहे. यामुळे रेंगाळलेल्या नागरी सुविधांना गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.