कोल्हापूर : कोल्हापुरात शेंडा पार्क येथे होणाऱ्या रुग्णालयासाठी या आधी ४५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असताना येथे आरोग्य नगरीत रस्ते करण्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शासकीय कामाची ही पद्धत चर्चेत आली आहे.
शेंडा पार्क भागात वैद्यकीय नगरी आकाराला येत आहे. ३० एकरामध्ये ११०० खाटांचे सुसज्ज आरोग्य संकुल उभारले जाणार आहे. येथे ६०० खाटांचे सामान्य व बाह्य रुग्णालय, स्वतंत्र कर्करोग रुग्णालयासाठी २५० आणि अतिविशोपचार रुग्णालयासाठी २५० खाट अशी याची रचना आहे. याकरिता ४५१ कोटी रुपये निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असून, हे काम गतीने सुरू आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी या कामासाठी निधीसाठी प्रयत्न केले होते.
दरम्यान, आता या वैद्यकीय नगरीतील रस्ते सुसज्ज व्हावेत यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने शुक्रवारी १४ कोटी ९७ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. यामुळे येथे सुसज्ज इमारतीच्या बरोबरीनेच गुळगुळीत रस्ते आकाराला येण्याची चिन्हे आहेत.