कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील निकृष्ट रस्ते कामाचा ठपका असलेले नगर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना मंगळवारी पदावरून हटवण्यात आले आहे. महापालिकेचे उपायुक्त हर्षजित घाटगे यांच्याकडे हा पदभार देण्यात आला आहे. यामुळे गेली अनेक वर्ष गोड मारून वेळ न्यायची पण कामाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करायचे हा फंडा सरनोबत यांच्या अंगलट आल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता त्यांच्याकडे जल अभियंता ही काटेरी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या बांधकाम विषय कामाची मुख्य जबाबदारी नगर अभियंता यांच्याकडे आहे. लोण्याचा गोळा असलेल्या नगर अभियंता पदासाठी अधिकाऱ्यात चुरस असते. नारायण भोसले या मागासवर्गीय अधिकाऱ्याला हे पद निकषांवर आधारित मिळणे अपेक्षित होते. मात्र कुरघोडी करून सरनोबत यांनी पद कसे मिळवले याची खुमासदार चर्चा महापालिका वर्तुळात असते.
‘वर्षा’वरून सूत्रे हलली गेली अनेक वर्ष त्यांच्याकडे पदभार असताना त्यांच्या कामाबद्दल अनेक तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या होत्या. महापालिकेतील आयुक्तासह वरिष्ठ अधिकारीही त्यांच्या कामावर नाराज होते. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापूर दौरा केला. तेव्हा शहरातील निकृष्ट रस्ते कामाचा त्यांना अनुभव आला. त्यातच त्यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. यातून त्यांनी नगर विकास विभागाशी संपर्क साधून सरनोबत यांचा नगर विकास विभागाचा रस्ताच बदलून टाकला. ठेकेदारांशी असलेली अर्थपूर्ण सलगी सरनोबत यांना नडली असल्याचा सूर आहे.