कोल्हापूर : राज्यामध्ये आरोग्य सेवा निर्देशांकामध्ये महापालिकेला दिलेल्या उद्दिष्टानुसार उत्कृष्ट काम केलेल्या महानगरपालिकेला शासनामार्फत गुणानुक्रमे देण्यात येतो. यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने राज्यामध्ये सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या कार्यक्रमाचे पारितोषिक व प्रमाणपत्र आयुक्त तथा अभियान संचालक एनएचएम धिरजकुमार यांच्या हस्ते महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी शुक्रवारी स्वीकारले. हा कार्यक्रम पुणे येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीमध्ये घेण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शासन आदेशाने कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत सर्व रुग्णालय व सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये शासनाने सर्व निर्देशांकाकरीता उद्दिष्ट दिले असून सर्व निर्देशांकाकरीता गुणांकन ठरविण्यात आले आहे. यामध्ये साध्य झालेल्या उद्दिष्टानुसार प्राप्त झालेले गुणांकन देऊन महानगरपालिकेस गुणानुक्रम देण्यात येतो. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त पंडित पाटील व आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांच्या नियोजनानुसार कोल्हापूर महानगरपालिकेने या सर्व निर्देशांकाचे माहे मार्च २०२४ अखेर उद्दिष्ट साध्य केले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व महानगरपालिकामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रथम क्रमांक आला आहे.

हेही वाचा – कागल तालुक्यातील नदीत बुडून चौघांचा मृत्यू; एकाचा शोध सुरु, तालुक्यावर शोककळा

हेही वाचा – मुश्रीफ विदेशातूनही सक्रिय, रस्ते प्रकल्पप्रश्नी कोल्हापूर महापालिका आयुक्त आणि शहर अभियंत्याचे कान टोचले

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे सावित्रीबाई फुले, पंचगंगा व आयसोलेशन रुग्णालय तसेच सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामार्फत विविध राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येते. यात प्रामुख्याने गरोदरमाता नोंदणी, त्यांची तपासणी, आर.सी.एच. पोर्टल, ० ते १६ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण, कुटुंब नियोजन कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, माता व बालमृत्यू अन्वेषण, साथरोग, राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम, पीसीपीएनडीटी, एनसीडी, क्वालिटी ईनश्युरन्स व कायाकल्प, आयडीएसपी, कुष्ठरोग, इ.कार्यक्रम राबविले जातात. या सर्व सेवांच्या उद्दिष्टपूर्ततेसाठी आरसीएच नोडल ऑफिसर, प्रोग्राम मॅनेजमेंट युनिट, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, सर्व कार्यक्रमांचे नोडल ऑफिसर, वैद्यकीय अधिकारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नर्सिंग स्टाफ, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट व आशा स्वयंसेविका या सर्वांचे सहकार्य लाभले आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur municipal corporation ranks first in the state in health service index ssb