कोल्हापूर : अनधिकृत होर्डिंग उभारणाऱ्यांना कोल्हापूर महापालिकेने बुधवारी दणका दिला आहे. शहरातील तिघा अनधिकृत होर्डिंगधारकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुंबई येथे भले मोठे होर्डिंग कोसळून अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यात सर्वत्र तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. कोल्हापूर महापालिकेने होर्डिंग धारकांची बैठक घेऊन अनधिकृत फलक काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने ही मोहीम जारी करत अनेक ठिकाणचे फलक काढण्यात आले.
हेही वाचा >>> यंत्रमागाच्या वीज सवलतीची जाचक अट आणखी किती काळ?; अट रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आज साने गुरुजी मेन रोड येथे संतोष जाधव, भक्ती पूजा नगरातील राजेंद्र ओसवाल आणि खराडे कॉलेज जवळील नवरत्न केंद्र या तीन अनधिकृत होर्डिंग धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, दसरा चौकात नवग्रह रत्न केंद्र तसेच शुभेच्छा देणारे अनधिकृत फलक काढण्यात आले, अशी माहिती इस्टेट विभागाचे अधिकारी विलास साळुंखे यांनी दिली. त्यांना कळले नसेल का? कोल्हापुरातील दसरा चौकातील नवग्रह रत्न केंद्राचे फलक कोल्हापूर महापालिकेने हटवण्याची कारवाई आज केली. ग्रह, दिशा ओळखून जीवनात काय बदल होईल याचे भाष्य करणाऱ्या या फर्मला आपल्या भवितव्यात काय दडले आहे हे कळले नसेल का? अशी मिष्कीली कारवाई नंतर होत राहिली.