लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : नागरिकांच्या अपेक्षांचा विचार करून जास्तीत जास्त उपयुक्त योजनांचा अर्थसंकल्पामध्ये समावेश केल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी आर्थिक पातळीवर महापालिकेला झुंजत राहावे लागणार असल्याचे बुधवारी अंदाजपत्रकातून दिसत आहे. उत्पन्नाच्या बाजू आक्रसत असल्याने विकासकामांवर नाममात्र भर देण्यात आला आहे. महसुली भांडवली व विशेष प्रकल्प वित्त आयोग मिळून १३३४ कोटी रुपये इतके जमेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करण्यात आले.

प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांना बजेट सादर करताना उपसमितीचे सदस्य अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप आयुक्त पंडीत पाटील, कपिल जगताप, सहा. आयुक्त नेहा आकोडे, संजय सरनाईक, उज्वला शिंदे, स्वाती दुधाने, कृष्णा पाटील, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, नगरसचिव सुनील बिद्रे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, कामगार अधिकारी राम काटकर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, परवाना अधिक्षक अशोक यादव व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सन २०२५-२६ चे ‘आपले अंदाजपत्रक’ तयार करताना नागरिकांकडून सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्याचा विचार केल्याचे प्रशासक तथा आयुक्त के. मंजू लक्ष्मी यांनी सांगितले. हे अंदाजपत्रक आज उपसमितीचे सदस्य अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडित पाटील यांनी प्रशासकांकडे सादर केले.

करवाढ विरहित अर्थसंकल्पात घरफाळा, पाणीपुरवठा शुल्क यामध्ये कोणतेही कर वाढ केली नाही. काही सेवांमध्ये अल्पशी सुधारणा केलेली आहे. महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर दिला असून वित्तीय शिस्त राखली जाणार आहे. कामाचा दर्जा उत्तम राहावा याकडे लक्ष देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.  उत्पन्न विषय ठळक बाबी  
   
मालमत्ता करापासून १०४ कोटी, नगररचना व विकास शुल्क पासून ९१. २१ कोटी, पाणीपुरवठा ८७ कोटी, मालमत्ता विभाग ४१ कोटी रुपये जमा अपेक्षित आहे. तर खर्चांमध्ये महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास कार्यक्रम अंतर्गत ५२४ कोटीचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. १०० ई बसेसचा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. शहरभर रस्त्यांची दुरवस्था असताना याकामी केवळ २०. ५० कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

महिला , क्रीडावर भर

महिला व बालकल्याण निधीमधून ६ कोटीची कामे केली जाणार आहेत. फुटबॉल स्ट्रीट विकसित करणे, हॉकी स्पर्धेचे आयोजन, सासणे मैदानात बॅडमिंटन मैदानाची उभारणी, अंबाई जलतरण तलावाच्या सुधारणा यांचा समावेश आहे.