कोल्हापूर : खोटय़ा माहितीच्या आधारे मला नाहक बदनाम करून उमेदवारी कापण्याचे प्रयत्न युतीतील काही घटक करत आहेत, असा आरोप शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत विरोधकांवर केला. माझ्याविरुद्धची बदनामी थांबवली नाही तर त्यांच्याविरोधातील १०० बॉम्ब माझ्याकडे तयार आहेत, अशा इशारा या प्रकारामुळे व्यथित झालेल्या आमदारांनी भावनात्मक होत दिला.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मला राजकीयदृष्टय़ा घेरण्याचे काम सुरू आहे, अशी कबुली देऊ न क्षीरसागर म्हणाले, मी कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही. तरीही, विरोधकांनी माझ्या बदनामीचे षडयंत्र हेतुपूर्वक रचले आहे. त्यामागे माझी शिवसेनेची उमेदवारी कापण्याचे कारस्थान सुरू आहे. १९८६ पासूनचे माझे काम पक्षनेतृत्वाला माहिती आहे. मला बदनाम करणाऱ्या विरोधकांच्या भ्रष्टाचाराची असंख्य प्रकरणे पुराव्यासह उजेडात आणणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माझ्या कामाची माहिती आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत माझ्या उमेदवारीला कसलाही धोका नाही. विरोधकांच्या छाताडावर बसून पुन्हा मीच निवडून येणार, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.