कोल्हापूर : दिवंगत कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी येथे निर्भय प्रभात फेरी काढण्यात आली. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या राहत्या घरासमोर गोळीबार झालेला होता. त्यांचे २० फेब्रुवारी रोजी निधन झाले. प्रत्येक वर्षी कार्यकर्ते या दिवशी निर्भय मॉर्निंग वॉक करतात. गोळीबार झालेल्या ठिकाणापासून ते पानसरे स्मारकापर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली.
निवृत्त न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील, आमदार सतेज पाटील, विजय देवणे, सतीशचंद्र कांबळे यांची भाषणे झाली. कॉम्रेड पानसरे का अधुरा काम हम करेंगे, आम्ही सारे पानसरे, महाराष्ट्र सरकार जवाब अशा घोषणा देत कार्यकर्ते पानसरे स्मारकाच्या ठिकाणी आले. यश आंबोळे, कृष्णात स्वाती यांनी पानसरे स्फूर्ती गीत गायले. उमा पानसरे, दिलीप पवार, एस. बी.पाटील, स्मिता पानसरे,सतीशचंद्र कांबळे, सुभाष जाधव, टी. एस. पाटील, आनंदराव परुळेकर, सुरेश शिपूरकर, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गोविंद पानसरे जीवन प्रवास
गोविंद पानसरे यांची कर्मभूमी कोल्हापूर असली तरी ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील. विद्यार्थी दशेत असताना गोविंद पानसरे अहमदनगरच्या राहाता तालुक्यातील कोल्हार गावातून शिक्षणासाठी कोल्हापूरमध्ये आले. कोल्हापूर हीच त्यांनी कर्मभूमी मानून काम सुरु केलं होतं. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर शिक्षणाचा खर्च निघावा म्हणून गोविंद पानसरे यांनी सुरुवातीला वृत्तपत्र विकण्याचं काम केलं.कोल्हापूरमध्येच गोविंद पानसरे यांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. नगरपालिकेत शिपाई, शिक्षक, त्यानंतर शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून देखील काम केलं. गोविंद पानसरे यांनी कामगारांच्या हक्काच्या प्रश्नी वकिली देखील केली. गोविंद पानसरे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात काम केलं. ते पक्षात विविध पदांवर काम करत होते. पक्षाच्या माध्यमातून कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी त्यांनी लढा उभारला. कामगार, शेतकरी, वीजदर वाढीविरोधातील आंदोलन यामध्ये ते सक्रिय असायचे. कोल्हापूरमधील गाजलेल्या टोल विरोधी आंदोलनात देखील ते सहभागी होते. पानसरे यांनी महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनचा सामाजिक आणि राजकीय घटना पाहिल्या होत्या. राज्यातील कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या विविध संघटना मार्गर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे येत असतं. पानसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचे सोप्या शब्दात अगदी सामान्य माणसाला कळेल असे शिवाजी कोण होता? हे पुस्तक लिहिले होते. नाव आहे. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचं लोककल्याणकारी आणि वास्तवावादी चित्रण मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पानसरे यांनी या शिवाय इतर पुस्तकांचे देखील लेखन केले आहे.