कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र – कोकण यांना जोडणाऱ्या करूळ घाटातील वाहतूक रस्ता रुंदीकरण, काँक्रिटीकरण व संरक्षक भिंतीच्या मजबुतीकरणासाठी १३ महिन्यापासून खंडित झाली होती. आता ती एकेरी का होईना पण सुरू झाली आहे. यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

कोकण घाटमाथ्याला जोडणाऱ्या कोल्हापूर – तळेरे या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेले दीड वर्षापासून सुरू आहे. पहिल्या टप्प्यात कळे ते कोल्हापूर या १६ किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या १७१ कोटीच्या कामाला मंजुरी मिळाली होती. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नाधवडे ते गगनबावडा या २१ किलोमीटर लांबीच्या काँक्रिटीकरणासाठी २४९ कोटी रुपये मंजुरी मिळाली आहे. या कामात करूळ घाटातील साडेनऊ किलोमीटर कामाचा समावेश आहे.

दरम्यान, करूळ घाटातील कामासाठी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. याचे काम संथ गतीने होत असल्याने अनेकदा आंदोलने करण्यात आली. या मार्गावर अनेकपर्यटनस्थळे आहेत. मात्र गेले वर्षभर पर्यटकांनी पाठ फिरवल्याने याचा हॉटेल, पेट्रोल पंप, रिसॉर्ट चालकांना फटका बसला होता. आता एकेरी वाहतूक सुरू झाल्याने किमान दिलासा मिळाला आहे.

आंदोलनाने जाग

या घाटाचे काम रखडल्याने ठाकरे सेनेने जानेवारी महिन्यात घाटा मध्ये आंदोलन केले होते. काम करणाऱ्या ठेकेदाराचा निषेध असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या होत्या. माजी आमदार वैभव नाईक,माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन छेडण्यात आले. गेली २ वर्षे हा घाट रस्ता बंद आहे. तारीख देऊनही घाट रस्ता सुरु केला जात नाही. आम्ही विरोधासाठी विरोध करत नाही. परंतु पूर्ण रस्ता बंद ठेऊन रस्त्याचे काम करणे हे राज्यातील पहिले उदाहरण आहे. रस्ता बंद करूनही ठेकेदाराकडून अत्यंत धिम्या गतीने काम सुरु आहे आणि झालेले काम देखील निकृष्ट दर्जाचे आहे. पुढील तीन ते चार महिने तरी घाट रस्त्याचे काम पूर्ण होईल असे वाटत नाही. त्यामुळे करूळ -गगनबावडा घाटरस्त्यावरून पुढील १० दिवसांच्या आत एकेरी वाहतूक सुरु करावी अन्यथा पुढील आंदोलन हे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर करण्यात येणार आहे, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी दिला. शिवसेना नेत्यांनी घाट रस्त्याची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी तातडीने सोमवारी यासंदर्भात संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर कामाला वेग आला.

Story img Loader