कोल्हापूर : पंतप्रधानांचा दौरा पालघर जिल्ह्यात असला तरी वाहतुकीचा परिणाम कोल्हापूरपासून ते सीमा भागापर्यंत जाणवत आहे. मुंबईतील वाहतुकीवरील ताण कमी येण्यासाठी ही उपाययोजना केली असल्याचे सांगण्यात येते. पुणे – बंगळुरू महामार्गावरील अवजड वाहतूक रोखली असल्याने कोल्हापुरातील सर्व औद्योगिक वसाहतींमध्ये अवजड वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. वाहतूक सुरळीत कधी होणार याची प्रतीक्षा वाहनधारकांना लागली आहे.
हेही वाचा – शिल्पकार आणि सल्लागार ‘गायब’
कोल्हापूर पोलीस आणि वाहतूक नियंत्रण शाखेने महामार्गावर जड वाहतूक सकाळपासून अडवली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात हजारो ट्रक अडकून पडले आहेत. मुंबईतील वाहतुकीवरील ताण कमी येण्यासाठी मध्यरात्रीपासून पोलिसांकडून मोठ्या माल वाहतूक गाड्या जागीच थांबवल्या आहेत. पालघर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्याचे प्रशासनाकडून कारण दिले जात आहे. आग रामेश्वरी…बंब सोमेश्वरी…या म्हणीचा प्रत्यय महामार्गावर वाहन चालकांना येत आहे.