अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा भूमिपूजन सोहळा आज (दि.५) साजरा होत आहे. कोल्हापुरात भाजपा, हिंदुत्ववादी संघटना, विश्वहिंदू परिषद यांच्यामार्फत या निमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाने कोणत्याही प्रकारे गर्दी करण्यास मज्जाव केला आहे. यासाठी पोलीस प्रशासनातर्फे या कार्यक्रमाच्या संयोजकांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे उत्सव करू नयेत. मंदिरं उघडून तेथं उत्सव करण्याचा प्रयत्न झाल्यास संसर्ग वाढीस लागण्याचा धोका या पत्रामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. अशा प्रकारचा उत्सव साजरा केल्यास भारतीय दंड विधान, राष्ट्रीय आपत्ती, साथीचे रोग अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही पोलीस प्रशासनानं दिला आहे. यामुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह निर्माण झाला आहे.

प्रशासनाची ही कृती चुकीची असल्याचे सांगत विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस अॅड. रणजितसिंह घाटगे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. मुस्लिम समाजाने सहकार्य केले होते तसे आजच्या बाबतीत हिंदूंनी सहकार्य केले पाहिजे, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, ही तुलना गैर असल्याचे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

कोल्हापुरात विश्व हिंदू परिषदेच्यावतीने संध्याकाळ ४ वाजता श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन, सत्संग, दीपोत्सव आणि साखर पेढे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या आनंद सोहळ्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन हिंदुत्ववादी संघटनांनी केले होते. सर्वांनी मास्क घालून या कार्यक्रमाला हजेरी लावावी असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे.