अवैध धंद्यावर छापा टाकल्यानंतर कारवाई न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना कोल्हापूरमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आलंय. लाचलूचपत प्रतिंबधक विभागाने शनिवारी ही कारवाई केली असून पुंडलिक विठ्ठल पाटील (वय 51, रा. कडलगे, ता. चंदगड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी पुंडलिक पटाील नेसरी पोलीस ठाणे येथे कार्यरत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुंडलिक यांनी त्यांच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर कायदेशीर कारवाई नको असेल तर पाच हजार रुपये दे, अशी मागणी पुंडलिक पाटील यांनी तक्रारदाराकडे केली. पाटील यांच्या या मागणीनंतर तक्रारदाराने याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली.
दाखल तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करण्याचे ठरवले. लाचलुचपत विभागाने पुंडलिक यांना रंगेहाथ पकडण्यासाठी आज (शनिवार) सापळा रचला. नियोजनानुसार पुंडलिक पाटील यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश मोरे, स.पो.फो.संजीव बंबरगेकर, पो.ना.विकास माने, पो.ना.नवनाथ कदम, पो.ना.सुनील घोसाळकर, चालक.पो.हे.कॉ. सुरज अपराध, या कोल्हापुरच्या लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी केली. तर या कारवाईला पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांनी मार्गदर्शन केले.