कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत कोणाचा पायपोस कोणाला नसल्याने राजकीय पक्षातच संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. अशा स्थितीत जिल्हा परिषद जिंकूच असा दावा करणाऱ्या सर्वपक्षीय नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. पक्षांतरावर जोर देणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषद पुन्हा ताब्यात ठेवू इच्छिणारे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील-आमदार सतेज पाटील, सहकारी संस्थांचे बळ पाठीशी असलेले राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ ग्रामीण भागातील ताकदीचा दावा करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सर्वाधिक आमदार असलेली शिवसेना यांनी सत्ता स्थापनेचा दावा आत्तापासूनच चालवला आहे. कोणा एकाच्या स्वबळावर सत्ता मिळण्याची शक्यता नसल्याने छुपी आघाडी, युतीला गती मिळण्याची चिन्हे असल्याने राजकारण वेगळे वळण घेण्याची चिन्हे आहेत.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम ही महत्त्वाची खाती आहेत. स्वाभाविकच, पक्षाच्या त्यांच्याकडून कोल्हापूर-सांगली जिल्ह्य़ासाठी मोठय़ा अपेक्षा आहेत. या अपेक्षांचे ओझे लक्षात घेऊन त्यांनी बेरजेच्या राजकारणावर भर दिला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीतील अनेकांच्या हाती कमळ देऊन पक्षाची ताकद वाढवली आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांची ताराराणी आघाडी व जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी मंत्री विनय कोरे यांना सोबत घेऊन जिल्हा परिषद काबीज करण्याच्या दृष्टीने त्यांची पावले पडू लागली आहे. आमदार संध्यादेवी कुपेकर व माजी खासदार निवेदिता माने यांचा गट भाजपशी घरोबा केल्याने दोन्ही गटासह भाजपला लाभ होण्याची शक्यता दिसत आहे.
काँगेस व राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षांतर्गत गटबाजीने ग्रासले आहे. शत्रूपक्षाला नमवण्याऐवजी पक्षांतर्गत छुप्या शत्रूंचा मुकाबला करण्यातच दोन्ही काँग्रेसला सामना करावा लागणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांना पक्षाचा एकाकी किल्ला लढवावा लागत आहे. शरद पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यात स्थानिक नेत्यांना ‘इतरांच्या घरात डोकावून पाहू नका’ असा सल्ला दिला असला तरी खासदार धनंजय महाडिक, आमदार कुपेकर, निवेदिता माने यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळण्याची शक्यता नसल्याने राष्ट्रवादीची मजल कुठपर्यंत जाणार, हा प्रश्नच आहे. याहून वेगळी अवस्था काँग्रेस पक्षाची नाही. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील यांच्यातील शीतयुद्धाचे पडसाद या निवडणुकीतही दिसत आहेत. तर हातकणंगले तालुक्यात जयवंतराव आवळे व प्रकाश आवाडे या माजी मंत्र्यांतील संघर्ष उफाळला आहे. आवळे यांनी आवाडे पुत्राचा उमेदवारीचा पत्ता कापला असल्याने आवाडे गटाने कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी स्थापन करत तालुक्यात काँग्रेसच्या विरोधातच बंडाचा झेंडा रोवला आहे. पक्ष नेतृत्वाची ही सुंदोपसुंदी पक्षाला मारक ठरण्याची शक्यता आहे.
काहीही झाले तरी भाजपच्या विरोधात लढायचेच असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अगोदरपासूनच घेतला होता. त्यामुळे जागावाटपाच्या बठकांचे अनेक सत्र पार पडूनही भाजप-स्वाभिमानीचे एकमत झालेच नाही. स्वाभिमानीने २२ जिल्हा परिषद मतदारसंघांत लढण्याची तयारी केली आहे. यानिमित्ताने भाजपविरोधात वातावरण निर्माण करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मतपेढीची मशागत करण्यास शेट्टी यांनी सुरुवात केली आहे. स्वाभिमानीला भरघोस यश मिळेल असे दिसत नसले तरी निकालानंतर जिल्हा परिषद त्रिशंकू होण्याची दाट शक्यता असल्याने असतील तितक्या संख्याबळाच्या आधारे मोक्याची पदे मिळविण्याची व्युवहरचना शेट्टी यांनी आखली असल्याचे त्यांच्या एकंदरीत हालचालीवरून दिसत आहे. प्रचारात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उतरवून त्यांची शासनाविषयीची भूमिका कार्यकर्त्यांसमोर वदवून घेण्याची चाल असल्याचेही दिसत आहे.
एकंदरीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फुटत असताना स्वबळावर सत्ता मिळविण्याच्या राणाभीमदेवी थाटाच्या घोषणा केल्या जात आहेत. मात्र प्रत्येक पक्षाची ताकद, तिच्या मर्यादा, प्रतिपक्षाकडून टाकले गेल्याचे डावपेचाचे फासे आणि नेत्यांच्या सोयीच्या सोयरिकीला ग्रामीण भागातील वैतागलेला मतदार यामुळे कोणा एका पक्षाला सत्ता मिळण्याची शक्यताही अंधूक आहे.
युती तुटल्याने प्रश्नचिन्ह
- तथापि, केंद्रातील व राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे स्थानिक राजकीय समीकरणेही झपाटय़ाने बदललेली आहेत.
- शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष या भाजपच्या मित्रपक्षांनी स्वबळ आजमावण्याचा नारा दिल्याने पालकमंत्री पाटील यांना अपेक्षित असलेले बेरजेचे राजकारण घडू शकले नाही.
- उलट या मित्रपक्षांनीच भाजप व त्यांना सहकार्य करणाऱ्या मित्रपक्षांची राजकीय कोंडी करण्याची व्यूहरचना सुरू केल्याने हा अडसर ओलांडण्याचे आव्हान भाजपला पेलावे लागणार आहे.
- शिवसेना व स्वाभिमानी यांनी काही तालुक्यांत एकत्र येत भाजपला रोखण्याचे डावपेच सुरू केले आहेत.