कोल्हापूर : वारणा समुहातील महिला सबलीकरणाला ५० वर्षे पूर्ण होत झाल्याच्या निमित्ताने होणाऱ्या सोहळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत रविवारी (२८ जुलै) वारणानगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तर राष्ट्रपती प्रवास करणाऱ्या मार्गावर जिल्हा प्रशासनाने संततधार पावसात युद्धस्तरावर नियोजन हाती घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वारणा समूहाचे अध्यक्ष, आमदार विनय कोरे यांनी सांगितले की, वारणा उद्योग समूहातील महिला सबलीकरणाच्या उत्कर्षासाठी स्थापन झालेल्या वारणा भगिनी मंडळ या महिला संस्थेस ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच, २०० कोटींवर ठेवी असणाऱ्या शोभाताई कोरे वारणा महिला सहकारी पतसंस्थेच्या विस्तारीत इमारतीचे भूमिपूजन आणि सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या मिनरल वॉटर प्रकल्पाचे उद्घाटन राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. उपलब्ध वेळेनूसार त्या वारणा बझार, वारणा बालवाद्यवृंद, कॅडबरी, बोर्नव्हीटा या संस्थाना भेट देणार आहेत.

हेही वाचा – पेरूला कवडीमोल भाव, बागा काढून टाकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

यानिमित्ताने ४० हजार महिलांचा मेळावा शिवनेरी क्रिडांगणावर दुपारी तीन वाजता होणार आहे. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्र व राज्यातले मंत्री उपस्थित राहणार असून दौऱ्याची जय्यत तयारी सुरु असल्याचे कोरे यांनी सांगितले.

वारणेला येणारे दुसरे राष्ट्रपती

वारणा समूहाची मातृसंस्था असलेल्या वारणा साखर कारखान्याच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यास माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे वारणानगरला आले होते. त्यानंतर उपरोक्त सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रपती मुर्मू वारणेत येत आहेत.

संततधार पावसात मोहीम

वारणानगरला रविवारी होणाऱ्या राष्ट्रपती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवास करणाऱ्या मार्गावर जिल्हा प्रशासनाने संततधार पावसात नियोजन हाती घेतले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने वाठार ते वारणानगर रस्त्याच्या डागडुजीसह दोन्ही बाजूंची स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. तसेच अतिक्रमण काढण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे.

हेही वाचा – पुणे : विद्यार्थ्यांना मारहाणीची शिक्षा, पुरंदर तालुक्यातील दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा

राष्ट्रीय महामार्गाच्या वाठार चौकातून वारणानगरपर्यंत वाहतुकीची प्रचंड वर्दळ सुरू असते. त्यामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यातच पावसाळा सुरु असल्याने रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने अक्षरशः रस्त्याची चाळण झाली आहे. रविवारी देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या मार्गावरून वारणानगरला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संततधार पावसात नियोजन हाती घेतले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने वाठार ते वारणानगर रस्त्याच्या डागडुजीसह दोन्ही बाजूंची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. तसेच दोन्ही बाजूंचे फलक व अतिक्रमणे काढून पाण्याचा निचरा व्हावा यासाठी गटर्स काढण्याचे काम जेसीबीने सुरु आहेत. तर कर्मचारी यांनी अतिक्रमण काढण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरु केली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी गुंतले आहेत. एकंदरीत राष्ट्रपतीच्या दौऱ्याबरोबरच प्रवाशांचाही प्रवास सुखकर होणार आहे.

अभियंता पावसात कार्यरत

आज दिवसभर संततधार पावसात डांबर तापवून खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पन्हाळा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सचिन कुंभार, अमोल कोळी भर पावसात छत्री घेवून कर्मचारी यांच्याबरोबर कार्यरत होते. हे पहिल्यांदाच घडत असल्याचे चित्र पहायला मिळते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur president droupadi murmu on sunday visit to warna the government system is working despite the rain ssb
Show comments