कोल्हापूर : जिल्ह्यातील शाहूकालीन राधानगरी धरणाचे पाच दरवाजे गुरुवारी उघडण्यात आले. यामुळे भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही यामुळे वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा : कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका वाढला; स्थलांतराचे प्रमाण वाढले
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरण १०० टक्के भरले असून आज सकाळी १० वाजता धरणाचा ६ क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला होता. तर सायंकाळी ४ वाजता आणखी ४ दरवाजे उघडले आहेत. ५ दरवाज्यातून ७१४० तर विद्युत विमोचकातून १५०० असा ८६४० क्युसेक विसर्ग भोगावती नदीत सोडला जात असल्याने या नदीसह पंचगंगा नदीच्या पूरपातळीत वाढ होत आहे.