कोल्हापूर : रविवार आणि पाऊस हे समीकरण आजही कायम राहिले गेले. जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रामध्ये धुवाधार पाऊस पडत आहे. राधानगरी धरण भरण्यास १० फूट अंतर राहिले असल्याने नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी अतिदक्षतेचा इशारा दिला होता.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम राहिला. पावसाची संततधार सुरू असल्याने सलग तिसऱ्या रविवारी कोल्हापूरकरांना घरातच दिवस घालवावा लागला. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ लागली आहे. राजाराम बंधाऱ्यांमध्ये ३७ फूट पाणी पातळी झाली असून ती इशारा पातळीस दोन फूट अंतर राहिले आहे. इचलकरंजी येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी सायंकाळी ६१ फूट ५ इंच होती. धोका पातळी ७१ फूट आहे.
हेही वाचा – कोल्हापुरात भर पावसातही गुरुपौर्णिमेचा उत्साह; नृसिंहवाडीत रीघ
दरम्यान राधानगरी धरणातही पाणीसाठा वाढत चालला आहे. येथे पाणी पातळी ३३८ फूट होती. ३४७ फूट पाणी पातळी झाल्यानंतर धरण पूर्ण क्षमतेने भरते. आणखी दहा फूट पाणी पातळी वाढल्यास एखादा दरवाजा उघडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ७९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक ५८ मिमी पाऊस पडला. याशिवाय पन्हाळा २९, राधानगरी २९.४, गगनबावडा ३५.६ ,भुदरगड ४१.४, आजारा ४१, चंदगड ३६ मिमी येथेही जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. सायंकाळी चार वाजता पुढील तीन तास अतिवृष्टी होण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता.