कोल्हापूर जिल्ह्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीवरून सतेज ( बंटी ) पाटील आणि महाडिक गट पुन्हा आमनेसामने आले आहेत. माजी आमदार अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांना बिंदू चौकात खुल्या चर्चेसाठी येण्याचं आव्हान दिलं होतं. पण, सतेज पाटील यांच्याऐवजी ऋतुराज पाटील दाखल झाले होते. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.
नेमकं काय घडलं?
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे कोल्हापुरचे राजकीय वातावरण तापले आहे. काल ( १४ एप्रिल ) महाडिक गटाकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. तेव्हा अमल महाडिक यांनी सतेज पाटलांना संध्याकाळी साडेसात वाजता बिंदू चौकात समोरा-समोर येऊन चर्चा करण्याचे आव्हान दिलं होतं.
हेही वाचा : “बंटी पाटील ९६ कुळी पाटील नव्हे, तर…”, धनंजय महाडिकांची घणाघाती टीका
त्यापार्श्वभूमीवर अमल महाडिक कार्यकर्त्यांसह सायंकाळी बिंदू चौकात आले. तर, सतेज पाटील यांच्याऐवजी अमल महाडिक यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत करून आमदार झालेले ऋतुराज पाटील सव्वाआठ वाजता बिंदू चौकात दाखल झाले. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, दोन्ही गटाचे कार्यकर्ते बिंदू चौकात आल्याने तणावाचे वातावरण तयार झालं होतं. पण, पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना एकमेकांसमोर येण्यापासून रोखलं.
“बंटी पाटील आले नाहीत”
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमल महाडिक म्हणाले, “बंटी पाटलांना बिंदू चौकात येण्याचं आव्हान दिलं होतं. ही निवडणूक कारखान्याची असून, व्यक्तिश: नाही आहे. राजाराम कारखान्याच्या संदर्भातील सर्व माहिती कोल्हापुरकरांना देण्यासाठी आव्हान केलं होतं. पण, बंटी पाटील आले नाहीत.”
हेही वाचा : “आदित्य ठाकरेंचा ‘पप्पू’ होऊ नये”, विखे-पाटलांच्या टीकेला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले…
“तुम्ही पळून गेला”
तर, ऋतुराज पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना म्हटलं, “महाडिकांना देखील बिंदू चौकात येण्याचं आव्हान करतो. महाडिक भ्याले… भ्याले… भ्याले… तुमच्यात धमक होती, तर बिंदू चौकात थांबायचे होते. मात्र, तुम्ही पळून गेला. तुमच्यात धमक असती, तर आमचे अर्ज अपात्र करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला नसता. त्यामुळे राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत पराभव होणार असल्याचं सिद्ध झालं आहे,” असा हल्लाबोल ऋतुराज पाटील महाडिकांवर केला आहे.