कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग विरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गुरुवारी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व आमदार अशोक माने यांनी पाठिंबा दर्शवला. शेतकऱ्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आंदोलनात उतरण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापुरातील शक्तिपीठ महामार्गावरून जिल्ह्यात संभ्रमाची स्थिती दिसत आहे. याआधीच प्रकाश आबिटकर व हसन मुश्रीफ या आजी माजी पालकमंत्र्यांनी विरोध नोंदवला आहे. तर , राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी गैरसमज दूर करून प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याची भूमिका घेतली आहे. गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीने राज्यव्यापी परिषद घेऊन विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची शक्तिपीठ प्रकल्पाबाबत भूमिका आजमावून घेण्याचा निर्णय या परिषदेत घेण्यात आला होता.

कोल्हापुरातील शक्तीपीठ महामार्ग बाबत १५ ऑक्टोबर रोजी शासन आदेशाने अधिसूचना रद्द केलेली असताना देखील पुन्हा कोल्हापुरातून महामार्ग रेटायची तयारी सुरू असताना माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, आमदार अशोक माने यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी आंदोलनात देखील सहभागी होण्याचे तसेच मुख्यमंत्र्यांच्या कडे मागणीसाठी पाठपुरावा करण्याचे वचन आज शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील बाधित गावातील शेतकऱ्यांनी निवेदन दिल्यानंतर जाहीर केले.

यावेळी आमदार यड्रावकर म्हणाले, शिरोळ सहित कोल्हापुरातील शेत जमिनी या बागायत आहेत व शेतकरी अल्पभूधारक आहेत. पर्यायी महामार्ग असताना महापुराला आमंत्रण देत शेतकऱ्यांची शेती नष्ट करण्याची गरज नाही. आम्ही पूर्वी शेतकऱ्यांसोबत होतो व आज देखील आहे व उद्या देखील राहू.

आमदार अशोक माने म्हणाले, निवडणुकीपूर्वी शक्तिपीठ महामार्गाची अधिसूचना आल्यानंतर मी बाधित गावांना भेटी देऊन आंदोलनाला समर्थन दिले होते. अधिवेशन काळात मुख्यमंत्री महसूल मंत्री व एमएसआरटीसीचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून महामार्ग रद्द होण्यासाठी प्रयत्न करू. सरकारने सकारात्मक पाऊल न घेतल्यास १२ मार्च आंदोलनात सहभागी होऊ.

संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले, निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री व आमदारांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करतो असे आश्वासन देणे व सत्ता आल्यानंतर पुन्हा शब्द फिरवणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नव्हे. विविध बातम्या पेरून शेतकऱ्यांचा संभ्रम फडणवीस यांनी करू नये. जनतेला अंगावर घेऊन केवळ कंत्राटदारांसाठी महामार्ग करण्याचा अट्टाहास सरकारचा आहे.

माजी बांधकाम सभापती महादेव धनवडे म्हणाले, सरकारने आपला दुराग्रह सोडावा, सरकारचा निर्णय आत्महत्या आहे. मोजणी अधिकाऱ्यांनी गावात पाय ठेवला तर त्यांना वाईट परिणाम भोगावे लागतील. निवडून आले आमदारांनी जनतेच्या पाठीशी राहावे कंत्राटदारांच्या नको.

आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी शेतकऱ्यांच्या साठी कोरा कागद आणावा समर्थनासाठी कोठेही करायला तयार आहे, असे सांगितले. आमदार अशोक माने यांनी शेतकऱ्यांच्या बरोबर शक्तीपीठ महामार्ग रद्द कराची घोषणा दिल्या. शिष्टमंडळात शिवाजी कांबळे, ,गुंडू दळवी, राजगोंडा पाटील, बापू दळवी, कृष्णात पाटील, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.