कोल्हापूर : कोल्हापूर , सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यांसमोर महापुराचे पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे. अलमट्टी धरणातून किमान दोन लाख क्यूसेक्स विसर्ग वाढवण्यासाठी कर्नाटक शासनावर दबाव आणावा, अशी मागणी कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समिती आणि आंदोलन अंकुश यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शनिवारी केली आहे. मात्र याकडे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार आणि आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी म्हटले आहे की, कृष्णा खोऱ्यातील कोयना, वारणा ( चांदोली ),राधानगरी यासह सर्व धरणांच्या पाणलोटक्षेत्रामध्ये गेले काही दिवस तुफान पाऊस सुरू आहे. सर्व धरणातील पाणीसाठा वेगाने वाढतो आहे. तसेच कृष्णा, कोयना, वारणा, तारळी, पंचगंगा या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांचे पाणीही वेगाने वाढते आहे. परिणामी कृष्णा,वारणा आणि पंचगंगा या नद्यांच्या काठावरील सांगली, कोल्हापूर, सातारा या सर्व जिल्ह्यातील शहरे आणि गावांना महापुराचा धोका निर्माण झाला आहे. परंतु सांगली कोल्हापूर जिल्ह्याचे स्थानिक प्रशासन तसेच जलसंपदा विभागातर्फे अलमट्टी धरणातील पाणीसाठा कमी करण्यासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. अलमट्टी धरण आणि त्या शेजारच्या हिप्परगी बंधाऱ्यामध्ये नियमबाह्यरित्या पाणीसाठा केला जात आहे. वास्तविक अलमट्टी धरणातून आत्ताच तातडीने किमान दोन लाख क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग वाढवण्याची गरज आहे. तरच महापुरावर नियंत्रण करता येईल. परंतु सांगली व कोल्हापूर जिल्हा प्रशासन तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आहेत.

हेही वाचा – कोल्हापुरात पंचगंगा नदी पुन्हा इशारा पातळीच्या दिशेने; ७२ बंधारे पाण्याखाली

आम्ही आपल्याशी वारंवार संवाद केला. तसेच संपर्क साधला. तुम्ही तातडीने त्याची दखल घेऊन महापूर रोखण्यासंदर्भात सांगली व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तसेच दोन्ही जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले होते. यासंदर्भात आपण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगही घेतली होती. त्यावेळी कर्नाटकातील अलमट्टी तसेच हिप्परगा बंधारा येथील पाणीसाठ्यावर लक्ष ठेवा, नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. परंतु त्या सूचनांचे पालन प्रशासनाकडून बिलकुल होताना दिसत नाही.

जोरदार पाऊस सुरू असताना आणि धरणे भरण्याची वेळ आली तरीसुद्धा दोन्ही जिल्ह्यांचे प्रशासन आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी हातावर हात ठेवून निवांत बसले आहेत. जलसंपदा विभागाचे राज्याचे मुख्य सचिव दीपक कपूर यांनाही आम्ही सविस्तर माहिती देऊन अलमट्टी धरणातील पाण्यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्यात अशी मागणी केली होती परंतु त्यांनीही काही केले नाही. त्यामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यातील नद्यांच्या काठावरील शहरे आणि ग्रामीण भाग यांच्यासमोर महापुराचे भयंकर संकट उभे राहण्याची दाट शक्यता आहे.

केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार पावसाळ्याच्या सुरुवातीपासून सर्व धरणातील पाणीसाठा नियंत्रित करावा अशी आम्ही सातत्याने मागणी करत होतो, परंतु त्या संदर्भातही सांगली आणि कोल्हापूरचे जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाने कर्नाटकाशी कोणताही समन्वय केल्याचे दिसून आलेले नाही.

निवेदनात म्हटले आहे की, अलमट्टी धरणामध्ये केंद्रीय जल आयोगाची तत्त्वे धाब्यावर बसवून सुरुवातीपासूनच पाणीसाठा सुरू केला आहे. पावसाळ्याची अजून सुरुवात आहे, तरीसुद्धा अलमट्टी धरणातील पाणीसाठा जवळजवळ शंभर टीएमसी झाला आहे. तसेच त्या धरणाची पाणीपातळी आत्ताच ५१८ मीटर झाली आहे. वास्तविक ही पाणी पातळी पावसाळा संपताना असायला हवी आहे. ती आत्ताच त्यांनी गाठली आहे. परंतु याकडे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचे प्रशासन आणि जलसंपदा विभाग लक्ष द्यायला तयार नाही. त्यांनी तातडीने कर्नाटक प्रशासन तसेच तेथील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून अलमट्टी धरणातून वेगाने विसर्ग वाढवण्यासाठी खटपट करण्याची गरज आहे.

हेही वाचा – अवघा कोल्हापूर जिल्हा चिंब; जिल्हाधिकाऱ्यांच्या सतर्क राहण्याच्या सूचना

अलमट्टी धरणातून सध्या किमान दोन लाख क्यूसेक्स विसर्ग सुरू झाला पाहिजे, तरच येत्या दहा-बारा दिवसात येऊ शकणाऱ्या संभाव्य महापुराच्या संकटावर नियंत्रण मिळवता येईल. याचे कारण सध्या पावसाचे प्रमाण वाढते आहे. पावसाचा जोर ३० ऑगस्टपर्यंत राहणार आहे आणि अलमट्टी धरण आत्ताच भरून घ्यायची तयारी सुरू आहे. अशावेळी कृष्णा खोऱ्यामध्ये महापुराचा शंभर टक्के धोका उद्भवणार आहे. तरी कृपया आपण सांगली व कोल्हापूर जिल्हा प्रशासन तसेच जलसंपदा विभाग यांना याबाबत तातडीने हालचाल करण्याचे निर्देश द्यावेत. अलमट्टी धरणातून तातडीने विसर्ग वाढवायला प्रयत्न करण्याचाही सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.