कोल्हापूर शहर आणि लगतच्या कळंबा गावात करोना रुग्णसंख्या वाढत असताना याचा कोल्हापूरकरांना जणू विसर पडला, असे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरु असल्याने कळंबा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. हे दृश्य पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती.
कोल्हापूर जिल्ह्यात करोना महामारीचे संकट वाढत चालले आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या आठ हजाराहून अधिक झाली आहे. याचा मुकाबला करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच रुग्णांची दवाखान्यात उपचार होत नाहीत, अशा तक्रारी आहे.
एकीकडे अशी गंभीर परिस्थिती शहरात निर्माण झालेली असताना दुसरीकडे नागरिकांनी वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी कळंबा तलावावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. दरवर्षी येथे पावसाळ्यात निसर्गप्रेमींची गर्दी होत असते. पण यंदा करोनाचं गहिरं संकट असतानाही त्याकडे नागरिकांनी डोळेझाक केल्याचे चित्र आहे. या गर्दीमध्ये वर्षा विहाराचा आनंद घेताना मास्क, फिजिकल डिस्टंसिंग याचा विसरही नागरिकांना पडला होता.