कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाड गावचा सुपुत्र, युवा कृषी धोरणकर्ता व संशोधक विनायक हेगाणा याची युनायटेड किंग्डम सरकारच्या आरोग्य व ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या जबाबदारीवर काम करणारे विनायक हेगाणा हे देशातील पहिले कृषी पदवीधर संशोधक ठरले आहेत. स्वान्सी विद्यापीठाच्या संशोधक व संचालक डॉ. इमा फारसन या सल्लागार गटाचे नेतृत्व करत आहेत. या सल्लागार मंडळाच्या माध्यमातून विनायक हे विशेष प्रतिनिधी म्हणूनही समन्वय करतील. काही महिन्यांपूर्वीच हेगाणा यांना ब्रिटिश सरकारच्या ‘चेव्हनिग ग्लोबल लीडर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच ‘लोकसत्ता तेजांकित’ हा पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक नामांकित विद्यापीठामध्ये संशोधन विषयक अभ्यास करत असताना हेगाणा यांना युनायटेड किंग्डम मधील शेतकरी व ग्रामीण भागातील अभ्यासातून विविध प्रकारची माहिती मिळाली. हेगाणा यांच्या ग्रामीण मानसिक आरोग्य विषयक संशोधन कामाची दखल घेऊन युनायटेड किंग्डम मधील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी धोरण निर्मिती व सल्ला या महत्त्वपूर्ण कामाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. हेगाणा यांचे ‘शेतकरी आत्महत्या शोध आणि बोध’ हे पुस्तक शिवारात काम करणारा कार्यकर्ता ते लेखक या भूमिकेतून प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक संशोधक, अभ्यासक, कार्यकर्ता, शेतकरी, युवापिढी, प्रशासकीय अधिकारी यांना मार्गदर्शक ठरत आहे. या पुस्तकात शेतकरी आत्महत्येचा फक्त उपापोह न करता, शाश्वत उपायायोजनेतून कृती कार्यक्रम सुचवलेला आहे. शेतकरी आत्महत्या या प्रश्नाकडे बघण्याचा सर्वसमावेशकपणे दृष्टिकोन पुस्तकात मांडण्यात आला आहे.

हेही वाचा : “महाराष्ट्र हे गुंड, भूमाफिया, खंडणीबहाद्दरांचे राज्य बनले आहे”, अंबादास दानवे यांची कोल्हापुरात टीका

आतापर्यंत, जगातील १८ देशांमधील ३२ युवकांना (जे युवक नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून सामाजिक प्रश्नांवर शाश्वत पर्यायी मार्गाने काम करतात तसेच ज्यांच्या कामाचा प्रभाव हा जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाने (UNDP) ठरवलेल्या १२ शाश्वत विकास ध्येयांअंतर्गत (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल , SDG) पडतो) ‘ग्लोबल चेन्जमेकर फेलोशिप’ देऊन गौरविण्यात आले आहे. कोल्हापूर कृषी महाविद्यालयातून पदवीधर शिक्षण घेऊन विनायक हेगाणा यांनी मागील ९ वर्षांपासून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाड्यात अविरतपणे काम केले. जिल्हास्तरावर धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत ते सहभागी होते. शिवार संसद, युवा चळवळ उभी करून त्यांनी शेतकरी कुटुंबातील युवकांची फौज उभी केली आहे. आत्महत्या होऊच नये यासाठी “शिवार हेल्पलाइन” या संशोधनपर संकल्पनेतून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात त्यांना यश आले.

हेही वाचा : तयार मल्लांचा शोध; उमेदवारीसाठी महायुती – ‘मविआ’त शह – काटशह 

याची राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यापीठ स्तरावर, टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स, मुंबई, आय.आय.टी मुंबई व निती आयोग, भारत सरकार मार्फतही दखल घेण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी ३ वर्षांच्या संशोधनातून कृषी पुरक उद्योग निर्मिती करण्यात आली. हेगाणा यांच्या या कार्यामुळे त्यांची जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UNDP) अंतर्गत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल (SDG) विभागांमध्ये सर्वोत्तम २५ सामाजिक संशोधकांमध्ये २०२० साली निवड करण्यात आली होती.

हेही वाचा : राज्यातील यंत्रमागधारकांच्या प्रलंबित मागण्यांना अभ्यास समितीनकडून न्याय; अनेक चांगल्या शिफारशी 

नुकतीच, आंतरराष्ट्रीय पातळीवर मानसिक आरोग्याच्या सर्वोत्तम तीन विद्यापीठांपैकी एक असलेल्या युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठीच्या शिवार पिरॅमिडची दखल घेत जगभरातून मानसिक आरोग्य शिक्षणाच्या निमित्ताने आलेल्या विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक यांना शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या ‘शिवार पिरॅमिड मॉडेल’वर मांडणी करण्यासाठी विशेष निमंत्रित केले होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur s vinayak hegana appointed as special adviser to united kingdom government css
Show comments