कोल्हापूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेल्या खरेदी फलकावरून मंगळवारी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये जुंपल्याचे दिसून आले. त्यांच्यात शाब्दिक आव्हान – प्रतिआव्हान देण्याचा प्रयत्न झाला.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनाने हिंदूंकडूनच खरेदी करावे, अशा आशयाचा फलक लावण्यात आला आहे. यातून, देशाशी बेईमानी करणाऱ्यांकडून खरेदी करण्याचे हिंदूंनी टाळावे, असा संदेश दिला आहे. या वादग्रस्त फलकाची कोल्हापुरात चर्चा होत आहे.

आज अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांना या फलका संदर्भात पत्रकारांनी विचारणा केली. तेव्हा ते म्हणाले, या फलकाबाबत मी पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक यांच्याशी बोललो आहे. ते या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करतील. कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराज यांची भूमी आहे. येथे हिंदू -मुस्लिम बंधूभाव दीर्घ काळापासून चालत आला आहे. तो पुढील हजारो वर्षे सुरू राहील. शाहू महाराजांनी घालून दिलेली बंधुत्वाची शिकवण कधीही तुटू शकणार नाही. कितीही मोठी ताकद आली तरी त्याचा परिणाम होणार नाही. राजर्षी शाहू महाराज यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, प्यारे जिया खान यांचे हे विधान झाल्यानंतर लगेचच हिंदुत्ववादी कार्यकर्ते या फलकाजवळ जमले. त्यांनी हिंदू ऐक्याच्या घोषणा दिल्या. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना बंडा साळोखे म्हणाले, कोल्हापुरात आज अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आले होते. त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही विधाने केली आहेत. मुळात आम्ही उभारलेल्या फलकावर देशाशी एकनिष्ठ असणाऱ्या व्यक्तीकडून खरेदी करावे, असा संदेश दिला आहे. यात काहीही वावगे नाही. तरीही कोणी कोल्हापुरात येऊन कायदा -सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला कोल्हापूर भाषेतच उत्तर दिले जाईल. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असताना काहीही विधान करून त्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या, आनंदात विरजण घालणाऱ्या प्रवृत्तीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे करीत आहोत.

यानंतर प्यारे खान हे फलक लावलेल्या शिवाजी महाराज चौकात गेले. तेथे त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान, या फलकाचे समर्थन आणि विरोध अशा दोन्ही प्रतिक्रिया येत असताना प्रशासनाकडून कोणती आणि कोणावर कारवाई होणार, याकडे लक्ष वेधले गेले आहे.