कोल्हापूर : उद्धव ठाकरे शिवसेनेचे कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख, इचलकरंजी नगरपालिकेचे माजी नगरसेवक महादेव गौड यांनी महाराष्ट्र दिनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. उद्योगमंत्री उदय सामंत, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या उपस्थितीत त्यांनी हा निर्णय घेतला. तर उद्या गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.
फेब्रुवारी महिन्यामध्ये ठाकरे सेनेचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे जिल्हा अध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते शिंदे सेनेत गेले. याचेच अनुकरण आज गौड यांनी केले. यावेळी त्यांनी ठाकरे सेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यावर टीकेची जोड उठवली.
हेही वाचा – कोल्हापूर : पराभवाच्या भीतीने मोदींचे काँग्रेसवर बेछूट आरोप; रमेश चेनिथला
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांना धक्के देण्याची राजनीती सुरू आहे. या अंतर्गत आज शिंदे सेनेने ठाकरे सेनेवर मात केली. आज महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र विचार घेऊन शिवसेना स्थापन झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे असे दोन भाग झाले. याचे पडसाद कोल्हापुरातही उमटले. ठाकरे सेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या छावणीत जाणे पसंत केले. लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना इचलकरंजीचे माजी नगरसेवक, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, सुपुत्र ऋषिकेश गौड यांनी आज पक्षाला जय महाराष्ट्र केला. उद्योग मंत्री उदय सामंत व शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या उपस्थितीत गौड यांनी आपण यापुढे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे काम करणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निपाणी येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार आहेत. यावेळी तेथे महादेव गौड यांच्यासह शिवसेनेचे काही पदाधिकारी शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.
यावेळी उदय सामंत म्हणाले, महादेव गौड यांनी इचलकरंजी परिसरामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी त्यांच्या घरासह पाच वेळा नगरसेवक निवडून आणण्याची महत्त्वाची कामगिरी निभावली. तरीही पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. महादेव गौड यांना ताकद दिली जाईल, असे आश्वासन सामंत यांनी दिले.
यावेळी बोलताना महादेव गौड म्हणाले, इचलकरंजी शहरांमध्ये शिवसेनेचे काम ३७ वर्ष करीत आलो आहे. सामान्य कार्यकर्ता ते उपजिल्हाप्रमुख अशी झेप घेतली आहे. परंतु पक्षांमध्ये गटबाजी वाढली आहे. ठराविक लोकांची मक्तेदारी झाली आहे. जिल्हाप्रमुख होण्याची संधी असतानाही ती अनेकांनी कुरघोड्या केल्यामुळे गेली. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर हे कुरघोड्या करीत असतात. आज मी नवा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी मला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरवले आहे. इचलकरंजी परिसरात या पक्षाचा विस्तार केला जाईल.
आधी जाधव आता गौड
उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी तीन महिन्यांपूर्वी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला होता. पत्रकार परिषद घेत जाधव यांनी सुषमा अंधारे, हातकणंगलेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी राजकीय डावपेच रचले. त्याचा परिणाम म्हणून मला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदावरून कमी केले, असा आरोप केला होता.