कोल्हापूर : किल्ले विशाळगड अतिक्रमणमुक्त करणारे आंदोलन रविवारी हिंसक वळणावर पोहोचले. घरांची जाळपोळ, वाहनांची नासधूस, दगडफेक यामुळे भर पावसात विशाळगडची वसाहत पेटत राहिली. हल्लेखोरांच्या आक्रमकपणाला पारावर उरला नव्हता. त्याचा फटका घटनेचे वृत्तांत करणाऱ्या पत्रकारांनाही बसला. अनेक पत्रकारांना चाकू लावून धमकावण्यात आले. त्यांची वाहने अडवणे, बुम काढून घेण्यास वृत्तांकन करण्यापासून रोखण्याचा प्रकारही घडला. या सर्व कारणामुळे पत्रकारांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर राहिली. राजकारण साधू पाहणाऱ्यांना बरेच काही साधता आले; पण त्यामध्ये पत्रकारांची वाताहत होत राहिली.

किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याच्या मागणीला आज जोर चढला होता. त्यासाठी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने गडप्रेमी, शिवप्रेमी जमले होते. त्यांच्या हातामध्ये कुदळ, फावडे दिसत होते. अतिक्रमण उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र अचानक या आंदोलनाला हिंसक वळण लागले. जाळपोळ दगडफेक अशा घटनांना उत आला. अनेक घरे फोडण्यात आली. दुकानातील साहित्य पळवण्यात आले. वाहने बेचिराख करण्यात आली. यातून विशाळगडचा परिसर खेळणा होऊन बसला. या घटनेचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना धमकावण्याचे प्रकार घडले. त्यांना चाकू लावून थांबवले गेले. वृत्तांकन करण्यापासूनही रोखण्यात आले. काहींचे बूम काढून घेतले. या भावना आज पत्रकारांनी उघडपणे व्यक्त केल्या असून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान याबाबत कोल्हापूर प्रेस क्लब ज्येष्ठ पत्रकारांनी या भावना व्यक्त केल्या आहेत. कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे यांनी म्हटले आहे की, आजपण होय आजपण… प्रसारमाध्यमच टार्गेट करण्यात आले. आपले सहकारी आज जीव मुठीत घेऊन आपले कर्तव्य बजावत होते. चित्रीकरण होऊ नये, नंतर गुन्हे दाखल होतील म्हणून, शिवप्रेमी म्हणून घुसलेल्या त्या समाजकंटकांनी आपल्या काही सहकाऱ्यांच्या वाहनांचा पाठलाग करून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. दोघा-तिघांच्या कमरेखाली तर चाकू लावून दमबाजी केली गेली. मोबाईलवरही शुटिंग करू दिले नाही, त्यामुळे मित्रांनो मागचा अनुभव म्हणून एवढंच सांगतोय की काळ सोकावला आहे, तुम्ही पण जरा सावध राहू द्या निदान शहाणे व्हा, मोबाईल स्टेटस प्रकरणात झालेल्या दंगलीचा अनुभव घेऊन, मी यापूर्वीच आपणाला सांगितले होते. जर कोणी अशाप्रकारे आंदोलन करणार असेल तर त्यांच्याकडून प्रथम आपल्या सुरक्षेची सर्व ती हमी घ्यायची. पण बातमीच्या नादात आपण हे दुर्लक्ष केले. आतातरी या बाबतीत एक होऊ या, अन्यथा आपल्यातीलच कोणाच्या तरी शोकसभेला जमायला लागेल. सुगंध भोरे यांना कोण आठवतंय काय ? आठवून बघा, असे म्हणत त्यांनी एका पत्रकारावर गुजरलेल्या गंभीर प्रसंगाची आठवण कोल्हापुरातील पत्रकारांना करून दिली आहे.

हेही वाचा – परकेपण पुरे आता शिवसैनिकांनाच उमेदवारी – भास्कर जाधव

हेही वाचा – कोल्हापूर : अतिक्रमण मुक्त विशाळगड आंदोलनाला हिंसक वळण; दगडफेक, जाळपोळीच्या घटना

एस न्यूजचे संपादक ज्येष्ठ पत्रकार कृष्णातजमदाडे यांनी नमूद केले आहे की, आजच्या आंदोलनात ज्यांचा अतिक्रमण प्रकरणाशी संबंध नाही अशा लोकांच्या नुकसानीची नैतिक जबाबदारी स्वीकारून नेतृत्व करणारे संभाजीराजे छत्रपती यांनी नुकसानग्रस्त लोकांची किमान विचारपूस तरी करायला हवी. तर आणि तरच ते राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज शोभतील. नाही तर दंगलीच्या आगीवर आपल्या राजकारणाची पोळी भाजणारे इतर राजकारणी आणि संभाजीराजे यांच्यात काही फरक राहणार नाही. कोल्हापूर प्रेस क्लब अध्यक्ष आणि कार्यकरिणीला माझी विनंती राहील माध्यम प्रतिनिधींच्या गाड्या रोखणं, त्यांचे बूम काढून घेणं, चाकू दाखवण्याच्या प्रकाराचा निषेध करणारे निवेदन संभाजीराजेंना सादर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.