वारंवार होणाऱ्या भांडणाच्या रागातून पत्नीने पतीचा गळा दाबून खून केल्याची घटना रविवारी येथील साकोली करणार येथे घडली. सागर नारायण बोडके (वय ३२, रा. साकोली कॉर्नर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. पत्नी निर्मला हिने पतीला जीवे मारल्याची कबुली जुना राजवाडा पोलिस ठाण्यात जाऊन दिली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सागर आणि पत्नी निर्मला यांच्यात वारंवार वाद होत होता. सागर मद्यपी होता, तो काहीही काम करत नव्हता. पत्नी घराशेजारीच बॅग विक्रीचे दुकान चालवत आहे. त्यांना पाच वर्षांची मुलगी आहे.
आज सायंकाळी सहाच्या सुमारास दोघांत जोरदार वाद झाला. सततच्या वादाला कंटाळलेल्या पत्नीने रागातून सागरचा गळा दाबून खून केला. त्यानंतर ती स्वतःहून तडक जुना राजवाडा पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हाची कबुली दिली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा सुरू केला आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक मानसिंह खोचे तपास करीत आहेत.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. पोलिसांनी पंचनामा करीत असल्याचे कारण सांगून गर्दी पांगवली.