चांदीनगरी हुपरी नगरपरिषदेत तृतीयपंथीयाची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. विधवा प्रथा बंदीच्या निर्णयानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे हे आणखी एक पुरोगामी पाऊल पडले आहे.
प्रकाश बावचे यांनी कालावधी पूर्ण झाल्यानंतर राजीनामा दिल्याने या पदावर अनेकांनी इच्छा व्यक्त केली असताना, आमदार प्रकाश आवाडे यांच्या कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीने देव आई या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तातोबा बाबुराव हांडे यांना स्वीकृत नगरसेवक होण्याचा मान दिला.
राज्यात पहिलीच संधी –
आज नगराध्यक्ष जयश्री गाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत हांडे यांच्या निवडीवर शिक्कामार्फत करण्यात आला. यानंतर त्यांची पारंपरिक वाद्याच्या गजरात गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली. तृतीयपंथीयाना सन्मानाने जगता यावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून हुपरी नगरपरिषदेने राज्यात अशाप्रकारची पहिलीच संधी दिली आहे.
निर्धार पूर्णत्वास –
“हुपरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी तातोबा हांडे यांचा ताराराणी आघाडीने उमेदवारी अर्ज भरला होता. तो तांत्रिक कारणास्तव रद्द झाला होता. तेव्हाच त्यांना सभागृहात सदस्य म्हणून आणण्याचा निर्धार केला होता. त्यांची आज स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्यानंतर या निर्धारास पूर्णत्व प्राप्त झाले.” असे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी पत्रकारांना सांगितले.