कोल्हापूर : धारदार शस्त्रांची विक्री करीत असलेल्या दोघा अन्यप्रांतियांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील २७ हत्यारे जप्त करण्यात आली. सुनिलसिंग मनोहरसिंग दुधाणे (म्हैसूर ) व गोंविदसिंग भारतसिंग टाक (निपाणी जि.बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. जिल्हयातील सर्व पोलिस ठाण्यातील प्रभारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला शिवजयंतीच्या अनुषंगाने सतर्क राहून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या पथकाने शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवले होते. गोखले कॉलेज ते हॉकी स्टेडियम मार्गावर रस्त्याकडेला दुचाकी लावून दोघे जण हत्यारे विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तेथे छापा टाकला. दुधाणे व टाक यांना पकडून त्यांच्या कडून विक्री साठी आणलेली तलवार, गुप्त्या, खंजीर, सत्तुर कोयते, चाकू असे २७ प्राणघातक हत्यारे, दुचाकी, रोख रक्कम असा ९१ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोघा विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलीकडे गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढलेले आहे. अशा घटना करताना गुन्हेगारांकडून धारदार, प्राणघातक शस्त्रांचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांमध्ये दाखल झालेल्या फिर्यादीमध्ये नमूद केलेले आहे. त्यामुळे ही धारदार शस्त्रे कोठून येतात, त्याचा निर्माता कोण आहे, ते कोणाच्या सांगण्यावरून बनवले जातात , याची चौकशी करण्याची मागणी केली जाते. धारदार शस्त्राच्या आधारे संघटित गुन्हेगारी वाढत असल्याचेही निदर्शनास आलेले आहे. गुन्हेगारीमध्ये वर्चस्व राहिले पाहिजे, आपली दहशत कायम राहून लोकांनी आपल्याला घाबरले पाहिजे, राडा करता आला पाहिजे, या आणि अशा अनेक कारणांनी शहरात धारदार शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. किरकोळ मारहाण, खून, खुनी हल्ले अशा गुन्ह्यांत घातक हत्यारे पाहून पोलिसही हैराण झाले आहेत. सहज मिळणाऱ्या हत्यारांची पाळेमुळे खोदून काढण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर आहे.
खुन्नस काढण्यासाठी किरकोळ कारणावरून होणाऱ्या भांडणांच्या रागातून तलवारी, कोयत्याने वार करून खून, खुनाचा प्रयत्न, दहशत माजवण्याच्या घटना घडत आहेत. अशा घटनांसाठी या तरुणांकडे तलवारी, कोयते यांसह विविध घातक हत्यारे सहज उपलब्ध होत आहेत. जुना बाजार, शेती आणि बांधकाम साहित्याच्या दुकानांमध्ये अवजारांची विक्री होत होती. मात्र, पोलिसांमुळे आता कोयत्यांची विक्री होत नाही, तरीही शहराच्या वेगवेगळ्या भागांत छुप्या पद्धतीने कोयता, तलवारी अशी हत्यारे मिळतात. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती अधिकच्या दराने त्या खरेदी करतात. ग्रामीण भागामध्ये शेतीची अवजारे बनवणाऱ्या ठराविक व्यक्तींकडून कोयते, तलवारी यांसारखी हत्यारे बनवून घेतली जातात. त्यानंतर दलालांमार्फत ती शहरात पोहोचवून त्याची विक्री केल्याचे बोलले जाते. हत्यारे बाळगणाऱ्यांच्या पोलिसांनी वेळीच मुसक्या आवळण्यासह घातक हत्यारे येतात कोठून याचा शोध घ्यायला हवा, अशी मागणी केली जात आहे.