कोल्हापूर : वारणा सहकारी दूध संघामार्फत मेहसाना, मुऱ्हा म्हैस खरेदी करून संघाच्या कार्यस्थळावर सुमारे ५०० म्हशींचे संवर्धन व विक्रीचे केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. येथील म्हैस खरेदी करणाऱ्या दूध उत्पादकांना ४२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे, अशी घोषणा संघाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी केली.

वारणा नगर येथील वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या ५६ व्या वार्षिक सभेत कोरे बोलत होते. कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी स्वागत केले. सर्व चौदा विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. ‘वारणा’चे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांना पद्म पुरस्कार देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

हेही वाचा : एक वनस्पती… फुलपाखरांच्या ४२ प्रजातींची लाडकी; आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत संशोधन प्रसिद्ध

कोरे म्हणाले, म्हैस दूधाची विविध उत्पादने बनवली जातात. केंद्रावर म्हशी खरेदी केल्यास परराज्यात खरेदीसाठी लागणारा वेळ, वाहतूक खर्च व होणारी फसवणूक टळणार आहे. दूध संस्थांना कमिशनमध्ये प्रतिलिटर ४० पैशांची वाढ केली आहे. दूध उत्पादकांसाठी फरक बिलाची घोषणा यावेळी करण्यात आली.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दुधाचा महापूर -२ बाबत नवे राष्ट्रीय धोरण अवलंबवले आहे. देशात सहकार क्षेत्रात ६ कोटी ४१ लाख लिटर दुधाचे संकलन होत आहे. ते १० कोटींवर नेण्याचा संकल्प केला आहे. यासाठी दूध उत्पादकांनी प्रमुख व्यवसाय म्हणून लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे कोरे म्हणाले.