कोल्हापूर : फुलपाखरू, पक्षी, वन्यजीव अभ्यासक फारुक औरंगजेब म्हेतर यांचे शनिवारी निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. पर्यावरण विज्ञानाचे द्विपदवीधर असलेले म्हेतर हे पर्यावरण चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते होते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली अभयारण्याचे ते अभ्यासक होते. वनविभागाच्या पक्षी निरीक्षण, अभ्यास, पक्षीगणती, विविध नोंदी, हालचाली टिपणे आदी उपक्रमात ते उत्साहाने सहभागी होत असत.

पश्चिम घाटातील निसर्गसंपदा आणि फुलपाखरांच्या जगताचे ते विशेष अभ्यासक होते. ऑर्किड वाचवण्यात पुढाकार घेतानाच त्यांनी फुलपाखरांची उद्याने तयार केली. नव्या दमाचे पक्षी निरीक्षक घडवले. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने पर्यावरण प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन केले. तीन दशकांच्या वाटचालीत मृदुभाषी म्हेतर यांनी कैक निसर्ग मित्र जोडले होते.

ताडोबा, नागझिरा, मेळघाट, सागरेश्वर, चांदोली, दाजीपूर दांडेली जंगलांत वनस्पती, प्राणी, पक्षी अभ्यासकांसाठी शिबिरे आयोजित केली होती. ग्रीन गार्ड या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना पर्यावरण जागृतीचे धडे दिले. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन मुलगे, सुना असा परिवार आहे.