कोल्हापूर: महान मराठा योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे सेनापती कापशी ता. कागल येथील स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या स्मारकाचा लोकार्पण सोहळा ऑगस्टमध्ये होणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सरसेनापती संताजी घोरपडे शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. अशा या महान योद्ध्याचे स्मारक पिढ्यान- पिढ्या प्रेरणादायी ठरेल, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने सेनापती कापशी ता. कागल येथे सुरु असलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे स्मारकाच्या कामासंबंधी आढावा बैठक मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. सरसेनापतींचे वारसदार श्रीमंत उदयबाबा घोरपडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांचीही यावेळी उपस्थिती होती.
हेही वाचा – इचलकरंजी पाणी प्रश्न अहवाल देण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून टाळाटाळ; राजू शेट्टी यांचा आरोप
सरसेनापतींचे वारसदार श्रीमंत उदयसिंह घोरपडे म्हणाले, स्वराज्यामधील सरसेनापती संताजी घोरपडे यांचा इतिहास ज्वलंत आणि धगधगता आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या स्मारकाच्या रूपाने इतिहासाचे हे जाज्वल्य जगासमोर आणले आहे.
डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, औरंगजेबाचा चरित्रकार खाफीखान यानेही सरसेनापती संताजीच्या शौर्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. एवढी त्यांची महानता होती. सरसेनापती संताजी घोरपडे यांच्याशी लढताना मोगलांसमोर फक्त तीनच पर्याय असायचे. ते म्हणजे मरण पत्करणे, पराभव पत्करणे किंवा पळून जाणे.
असे आहे स्मारक
कोल्हापुरातील प्रसिद्ध शिल्पकार किशोर पुरेकर हा पुतळा साकारत आहेत. आतापर्यंत नऊ कोटी निधीतून मुख्य स्मारक, सरसेनापती संताजी घोरपडे यांचा अश्वारूढ पुतळा, कंपाऊंड भिंत, बहुउद्देशीय हॉल, संग्रहालय, मुख्य स्मारक व कंपाऊंड भिंत, संग्रहालय, उर्वरित कंपाऊंड भिंत, पाणी पुरवठा व मलनिस्सारण, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, संग्रहालय इमारतीचे फर्निचर, हरित इमारत, पेविंग यांचा समावेश आहे.
यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड आदी उपस्थित होत.