कोल्हापूर : महाराष्ट्राला लोककलांचा समृद्ध वारसा असून या वारशाचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे, असे आवाहन करुन राज्यातील दूर्मिळ होत चाललेल्या लोककलांना प्रोत्साहन देऊन त्या टिकवण्यात राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येणारे विधिनाट्य सारखे महोत्सव महत्वपूर्ण ठरतील, असे प्रतिपादन राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेते ज्येष्ठ शिवशाहीर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांनी केले.
राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने २४ ते २६ मार्च या कालावधीत देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे सभागृहात विधीनाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेते ज्येष्ठ शाहीर राजू राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शाहीर अवधूत विभुते, नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे, सांस्कृतिक कार्य विभागाचे कार्यक्रम अधिकारी निलेश धुमाळ, माहिती अधिकारी वृषाली पाटील, शाहीर आझाद नाईकवडी, शाहीर शहाजी माळी, डॉ. सयाजीराव गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यातील विविध भागातील लोककलावंतांनी पारंपरिक लोककलांचे सादरीकरण केले. किरण पाचंगे व सिद्धार्थ कांबळे संच, सोलापूर यांनी संबळ – हलगी जुगलबंदी सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. वासूदेव जोशी समाज, धर्मेंद्र भोसले आरवडे, पंढरपूर यांनी वासुदेव गीते सादर केली. महर्षी राजारामबापू कदम कलासंच, परभणी यांनी गोंधळ सादर केला. महालक्ष्मी पोतराज महासंघ, पुणे (साजन लांगडे-अंकुश चव्हाण) यांनी पोतराज साकारला. तर शेखर भाऊ व हर्षल भाऊ परदेशी, सातारा यांनी आराधी भोपी मेळा सादर केला. यावेळी सादर केलेल्या संबळ – हलगी जुगलबंदी, वासुदेव, गोंधळ, पोतराज, आराधी आदी कलाप्रकारांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात व हात उंचावून भरभरुन दाद दिली. प्रशांत आयरेकर यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन करत कार्यक्रमाची उंची वाढवली. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्यामधील लोककलांचे जतन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने लोककला महोत्सव व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने राज्यातील दूर्मिळ होत चाललेल्या लोककलांना उर्जिततास्था प्राप्त होणे, त्यांचा वारसा टिकविणे, या लोककलांना प्रोत्साहन देऊन या संस्कृतीविषयी अस्मिता वृध्दिंगत करण्यासाठी 2सायंकाळी गोविंदराव टेंबे रंगमंदिर, देवल क्लब, खासबाग मैदान शेजारी, कोल्हापूर या ठिकाणी विधीनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात संबळ-हलगी जुगलबंदी, वासुदेव, गोंधळ, पोतराज, आराधी, डाकवादन व कहानी गायन, मादोळ, घांगळी वादन, डेरा वादन, थाळ वादन, किंगरी वादन, दिमडी-चोंडक जुगलबंदी, जागरण गोंधळ, भारुड, वाघ्यामुरुळी,कडकलक्ष्मी, डकलवार किंगरी अशा लोककलांचे राज्यातील विविध कलाकारांच्या माध्यमातून सादरीकरण होणार आहे. या महोत्सवातील कार्यक्रमांचा लाभ सर्व रसिक प्रेक्षकांनी घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.