कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचा मुंबईतील ठेकेदार बदलल्यामुळे दूध विक्रीला फटका बसल्याची माहिती पुढे आली आहे. याचा संघाच्या आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला आहे. गोकुळ दूध संघाची मुंबई ही हुकमी बाजारपेठ आहे. या महानगरात दूध वितरण वेळेत होण्यासाठी तेथे पॅकिंग क्षमता प्रतिदिन चार लाखाने वाढवून बारा लिटर करण्यात आली. मुंबईतील दूध वितरणाचे काम सुरतमधील कंपनीकडे सोपवले होते. ३१ मार्च रोजी ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर कंपनी बदलण्याचा निर्णय घेण्यात येऊन हे काम एन. आर. इंजिनिअरिंग दिल्ली या कंपनीकडे सोपवण्यात आले.

नव्या ठेकेदार कंपनीकडून वितरणाचे काम योग्य पद्धतीने होत नव्हते. दूध वितरकांपर्यंत पोहोचत नव्हते. पॅकिंगचा दर्जाही खालावला होता. याचा दूध विक्रीवर परिणाम झाला. ही घटना समजल्यानंतर गोकुळच्या नेतृत्वाने संचालक मंडळाला चांगलेच खडसावले. गोकुळ दूध संघाची मुंबईतील दूध वितरण काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. ठेकेदार बदलण्यात आल्याने दूध वितरण पूर्ववत झाल्याचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सांगितले.